

BJP workers oppose Raju Shinde's return home
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणारे राजू शिंदे रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार होते. सलग दोनवेळा पक्षातून बाहेर गेल्यानंतरही प्रदेश कार्यालयाने शिंदेंच्या प्रवेशाला सहमती दर्शविल्याने अनेक स्थानिक निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली होती. हा प्रकार लक्षात येताच ऐन प्रवेशाच्या पूर्वसंध्येला सोहळा रद्द करण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणीकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्षात नेहमीच पक्षशिस्तीवर विशेष लक्ष दिले जाते. मात्र, मागील दहा वर्षांत पक्षातील शिस्तीकडे नव्या इनकमिंग कार्यकर्त्यांसह काही जून्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सपशेल कानाडोळाच केला आहे. त्यात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत राजू शिंदे यांनी पक्षविरोधी निर्णय घेत पश्चिम मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढली होती. त्यावेळी पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत देखील शिंदे यांनी २०१९ ची पुनर्रावृत्ती केली. परंतु, अपक्ष न लढता शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी महायुतीविरोधात निवडणूक लढली.
दरम्यान, या निवडणुकीतही पराभव झाल्याने त्यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मागील वर्षभरपासून ते प्रवेशाच्या प्रयत्नात होते. परंतु, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली होती. विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले होते. त्यामुळेच स्थानिक नेत्यांसह काही मंत्र्यांचा त्यांच्या घरवापसीला नकार होता. हा विरोध शनिवारी पुन्हा वाढल्याने ऐनवेळी प्रवेश सोहळा रद्द केल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधून ऐकावसाय मिळाली. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अचानक दिल्लीला जावे लागल्याने प्रवेश सोहळा रद्द केल्याचे पक्षाकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश
विधानसभा निवडणुकीवेळी राजू शिंदे हे भाजपमधून ठाकरे गटात गेले होते. अन् आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा भाजपमध्ये येत आहेत. पक्षाची जागा वाढेल, या विचाराने त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याची चर्चा आहे.
ऐनवेळी प्रवेश रद्द
राजू शिंदे यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिक पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्र्यांकडे केली होती. स्थानिकांची नाराजी आणि हा विरोध लक्षात घेत प्रदेश कार्यालयाने शिंदेंचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत घेऊ अशी तंबी दिली होती. त्यावरून स्थानिकांचा विरोध मावळला होता. परंतु, प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच पुन्हा विरोध सुरू झाल्याने सोहळा रद्द करण्याची वेळ पक्षावर आली.