

पुणे: घरावर संकट येणार असून, ते दूर करण्याच्या बतावणीने साडेतीन लाखांचे दागिने चोरून पसार झालेल्या भोंदूला हडपसर पोलिसांनी अटक केली. नीळकंठ सूर्यवंशी (वय 35, रा. कण्हेरसर, ता. खेड, सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका 44 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेच्या पतीला दारूचे व्यसन होते. दोन वर्षांपूर्वी त्या पतीला घेऊन खेड तालुक्यातील कण्हेरसर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथे आरोपी सूर्यवंशी त्यांना भेटला. त्या वेळी सूर्यवंशीने फिर्यादी महिलेच्या पतीला दारू सोडण्यास सांगितले. सूर्यवंशीच्या सांगण्यावरून पतीने दारू सोडल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर सूर्यवंशीच्या संपर्कात महिला आली. कौटुंबिक समस्यांबाबत तो महिलेला मार्गदर्शन करायचा. महिला आणि सूर्यवंशी मोबाइलवरून एकमेकांच्या संपर्कात होते.
त्यानंतर 25 मार्च रोजी त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तुमच्या घरावर संकट आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतो, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर सूर्यवंशीने 27 मार्च रोजी महिलेला हडपसर गाडीतळ परिसरात बोलावले. भेटायला येताना मंगळसूत्र, मुलीची सोनसाखळी घेऊन या. मी तुम्हाला दागिने मंतरून देतो, असे सांगितले. दुपारी दीडच्या सुमारास महिलेने सूर्यवंशीची भेट घेतली.
दोघांनी एका रसवंतिगृहात रस प्याला. त्यानंतर त्याने महिलेला एक लिंबू दिले. महिलेकडील दागिने मंतरून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र, सुवर्णहार, सोनसाखळी असा ऐवज प्लास्टिक पिशवीत ठेवण्यास सांगितले. दागिन्यांची पिशवी त्याने स्वत:कडे ठेवली. महिलेला लिंबू घेऊन पुढे चालण्यास सांगितले. मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या, असे त्याने सांगितले. त्यानंतर दागिने असलेली पिशवी घेऊन सूर्यवंशी पसार झाला. महिलेने मागे वळून पाहिले, तेव्हा सूर्यवंशी पसार झाल्याचे लक्षात आले.
महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडले. त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले. सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सूर्यवंशीला न्यायालयात हजर करण्यात आले.