

छत्रपती संभाजीनगर : भडकलगेट जवळील डफळची मशिदीच्या जागेच्या वादातून आणि खंडणीच्या उद्देशाने बुधवारी (दि.८) रात्री सव्वादहा ते पावणेअकराच्या सुमारास काजीवाडा भागात मोठा राडा झाला. आरोपी शेख शारेख शेख सलीम याने आपल्या साथीदारांसह परिसरात दहशत माजवत मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला, तर एका वृद्धाचे घर बळकावण्यासाठी त्याला रॉडने मारहाण करत लुटले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, काजीवाडा येथील डफळची मशिदीचे अध्यक्ष शौकतअली जाकेरअली हाश्मी (५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख शारेख याने मशिदीच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी न्यायालयात दावा सुरू असून, त्याचा निकाल मशिदीच्या बाजूने लागल्याने शारेखने उच्च न्यायालयात अपील केले आहे. या रागातून बुधवारी रात्री १०:३५ वाजेच्या सुमारास शारेख, वसीम शेख, चार्ली आणि एका अनोळखी व्यक्तीने शौकतअली यांना घराबाहेर बोलावले. "कोर्टातील केस मागे घ्या," असे म्हणत त्यांना दगडाने मारहाण केली.
घर नावावर कर म्हणत वृद्धाला मारहाण
दुसरी घटना याच रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. आरोपी शेख शारेख याने मोहम्मद इदरिसोद्दीन मोहम्मद नसिरोद्दीन (६०) यांना डफळची मशिदीजवळ बोलावून घेतले. तुझे घर माझ्या नावावर करून टाक, आताच्या आता बॉन्डवर लिहून दे, अशी धमकी देत शारेख आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. दोघांनी मोहम्मद इदरिसोद्दीन यांना पकडून ठेवले, तर शारेखने त्यांच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतले. तसेच रॉडने त्यांच्या डोक्यावर मारून रक्तबंबाळ केले.
कॉलनीमध्ये आरोपीची मोठी दहशत असल्याने कोणीही मदतीला धावून आले नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.
मेरा पिस्टल निकाल म्हणत दहशत
यानंतर या आरोपींनी मशिदीचे उपाध्यक्ष साजेद खान साहेब खान यांच्या घरावर मोर्चा वळवला. शारेखने साजेद खान यांच्या उजव्या पायावर लोखंडी रॉडने वार करून त्यांना जायबंदी केले आणि "तेरे तंगडे तोडता" अशी धमकी देत दहशत निर्माण केली. मशिदीचे आणखी एक सदस्य मोहसीन उर रहमान खान यांच्या घरासमोर जाऊन, "मेरा पिस्टल निकाल" अशी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी सपोनि सईद खान अधिक तपास करत आहेत.