

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा अधिकृत प्रचार मंगळवारी (दि. १६) सायंकाळी थंडावला. आता गुरुवार, दि. १८ जून रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील तेरा मतदान केंद्रांवर ६३७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तर सोमवार, दि. २२ जून रोजी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या केंद्रावर मतमोजणी होणार आहे.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास निवडणुकीचा प्रचार २ जूनपासून आघाडीकडून ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे हे रिंगणात आहेत. याशिवाय एक अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणुकीचा अधिकृत प्रचार आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपला. आता १८ जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदेचे सदस्य मतदानाचा हक्क बजावतील.
दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण ६३७ मतदार आहेत. दोन्ही जिल्ह्यात एकूण १३ मतदान केंद्रांवर पसंतीक्रमानुसार बॅलेट पेपरवर मतदान नोंदविले जाणार आहे. त्यानंतर सोमवार, दि. २२ जून रोजी मतमोजणी होईल. ही मोजणी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात होणार आहे.
आचारसंहिता भंगाची एकच तक्रार
या निवडणुकीत आचारसंहिता भंगाची केवळ एक तक्रार दाखल झाली असून, ती जालना जिल्ह्यातील आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशी एकही तक्रार दाखल झालेली नाही. प्रत्यक्ष मतदानाआधी उद्या बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर लगेचच साहित्य वाटप करून मतदान कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रखाना होतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी दिली.