

Attempt to transfer land by mutual possession receipt on the basis of bogus documents and fake Aadhaar card
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मौजे मिटमिटा परिसरातील कोट्यवधी रुपये किमतीच्या ६० आर मोक्याच्या शेतजमिनीवर बोगस कागदपत्रे व बनावट आधार कार्डच्या आधारे परस्पर ताबा इसार पावती करून जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या टोळीचा छावणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छावणी पोलिसांनी तोतया मालक आणि त्याला बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.
शेख हुसेन शेख मोहम्मद फरदुस उर्फ शब्बीर (शब्बीस) गुलाम अब्बास युसुफ (रा. सादोळा, ता. माजलगाव, जि. बीड) आणि डुप्लिकेट आधार कार्ड बनवणारा इलीयस फारुकी (रा. बीड) अशी अटकेतील आरोपींची तर के. के. खान आणि पठाण अन्वरखान जहीर खान (रा. सय्यदनगर, पांगरी रोड, बीड) अशी अन्य दोन आरोपीची नावे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
ज्योतीनगर, न्यू एसबीएच कॉलनी येथील रहिवासी अल्पना सतीश मुंदडा (५९) यांच्या मालकीची मौजे मिटमिटा येथे मुंबई हायवे लगत गट क्रमांक १०९ मध्ये ६० आर शेतजमीन आहे. ही जमीन त्यांचे बंधू अमर रवींद्र काबरा यांनी सन २०२४ मध्ये त्यांना कायदेशीररीत्या बक्षीसपत्र करून दिलेली आहे.
मुंदडा कुटुंबीयांनी या जमिनीभोवती चारही बाजूंनी सिमेंटचे पक्के वॉल कंपाउंड केले होते. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले. त्या कामात समोरील भाग आल्याने सिमेंटचे कंपाउंड तुटले होते. याचाच गैरफायदा घेत काही दिवसांनंतर एका इसमाने त्या मोकळ्या जागेत 'या जमिनीचे मालक व कब्जेदार के. के. खान असा स्वतःचा मोबाईल क्रमांक असलेला काळा फलक अनधिकृतपणे आणून लावला.
थेट वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन
मुंदडा यांनी या प्रकरणाचा सखोल शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. जमिनीची हुबेहूब तीच चतुःसीमा दाखवून शब्बीर गुलाम याने मूळ शेख हुसेन शेख मोहम्मद फरदुस यांचे नाव व आधार तपशील वापरून बनावट आधार कार्ड तयार करून घेतले होते. स्वतःला जमिनीचा मूळ मालक भासवून त्याने ही जमीन कायमस्वरूपी विक्री करण्यासाठी १६ सप्टेंबर २०२६ रोजी पठाण अन्वरखान जहीर खान (वय ५२, रा. सय्यदनगर, पांगरी रोड, बीड) याच्या नावे परस्पर ताबा इसार पावती करून दिली. त्यानंतर पठाण अन्वरखान याने ही जमीन अमजद खान सईद खान पठाण यांना विक्री करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहीर प्रगटनही प्रसिद्ध केले होते. कोट्यवधींची जमीन हडपण्याचा कट रचल्याचे लक्षात येताच मुंदडा यांनी छावणी ठाणे गाठून फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक विवेक जाधव करत आहेत.
फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधा
या टोळीने अशाच प्रकारे बनावट आधार कार्ड आणि बोगस इसार पावत्यांच्या आधारे शहरातील इतरही मोक्याच्या जमिनी परस्पर लाटल्या आहेत का, यादृष्टीने पोलिस कसून तपास करत आहेत. कोणाची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तत्काळ छावणी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी विवेक जाधव यांनी केले आहे.
बुलडोझर चालवून जमिनीचे सपाटीकरण
३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास के. के. खान नावाच्या इसमाने मुंदडा यांच्या शेतजमिनीत अतिक्रमण केले. त्याने तब्बल २० ते २५ वर्षांपूर्वीची जुनी झाडे तोडून थेट बुलडोझर चालवून संपूर्ण जमीन सपाट करून टाकली. दोन दिवसांनंतर शेजाऱ्यांकडून ही माहिती मिळताच मुंदडा यांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.