

Attempt to jump from the District Collector's office building in pursuit of fast-track justice
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यात यावे, तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आंदोलक योगेश वाघमारे यांनी बुधवारी (दि. १८) थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते व इतर अधिकाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतली. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
वैजापूर येथील रोहित पठारे यांच्या निघृण हत्येप्रकरणात मागील काही दिवसांपासून विविध संघटनांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहे. तसेच प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा आणि खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, यासाठी रोहित पठारे यांचे मामा योगेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतरही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त करीत आंदोलक योगेश वाघमारे याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रशासकीय या प्रकारामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांसह अधिकाऱ्यांनी धावपळ करीत आंदोलकाची समजूत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल ४० मिनिटे सुरू असलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र दिले. अखेर या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न थांबवला.