

Attempt to grab land based on fake documents, incident in Karmad Shivara
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : करमाड शिवारातील गट क्रमांक ३० मधील ३ हेक्टर ३ आर जमीन बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, वृत्तपत्रातील जाहीर प्रगटनावरून हा प्रकार समोर आला. याप्रकरणी अनोळखी महिला व पुरुष भू-माफियांविरोधात करमाड पोलिस ठाण्यात १२ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रह्मरंभा रंगदास रायचुरी (५५, मूळ रा. हैदराबाद, तेलंगणा, ह.मु. एन-३, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांनी गट क्रमांक ३० मधील १ हेक्टर ६१ आर आणि १ हेक्टर ६२ आर अशी जमीन ९ मे २००६ रोजी डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलच्या लिलावातून खरेदी केली होती. या खरेदीचा सेल सर्टिफिकेट, खरेदीखत व फेरफारची नोंद त्यांच्या नावावर आहे, त्या जमिनीचा ताबाही त्यांच्याकडे असून, २० आर जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. त्याचे मोबदल्याचे पैसेही रायचुरी यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तसेच या जमिनीच्या रेखांकनास नगररचना विभागाची मंजुरी व अकृषक वापराची परवानगीही मिळाली आहे.
दरम्यान, ५ जून रोजी सुधीर लक्ष्मणराव मुळे (रा. कुंभेफळ) यांनी वकिलामार्फत या जमिनीच्या काही भागावर दावा सांगणारे जाहीर प्रगटन दिले होते. त्यावर रायचुरी यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर राजू नारायण नवपुते आणि अर्जुन अंकुश बकाल (रा. चिकलठाणा) यांनीही याच गटातील ७ एकर २३ गुंठे जमीन तोंडी व्यवहार झाल्याचा दावा करत जाहीर प्रगटन केले.
त्यावर रायचुरी यांनी पुन्हा आक्षेप घेत स्पष्ट केले की, त्यांनी कोणीही असा करार केलेला नाही. यानंतर ७जुलैला एका अनोळखी महिलेने अॅड. आर. बी. हिवराळे आणि अॅड. के. आर. खंडाळकर यांच्यामार्फत जाहीर प्रगटन देत रायचुरी यांचे आक्षेप खोटे असल्याचा दावा केला. त्यावर रायचुरी यांनी ११ जुलै रोजी पुन्हा आक्षेप नोंदवत बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक होत असल्याचे जाहीर केले. यावरून करमाड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक भारत निकाळजे करीत आहेत.
या प्रकरणात रायचुरी यांच्या नावाने बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड तयार करण्यात आले असून, त्यावर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आला आहे. २६ जून रोजी ही कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आली. त्याच दिवशी काही जण हैदराबाद येथील त्यांच्या घरी जाऊन जमिनीबाबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र घरातील लोकांनी त्यांना बाहेर काढले.