

Thieves break teacher's house in CIDCO, steal jewelry
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी कुटुंबासह बाहेगावी गेलेल्या शिक्षकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे सिडको वाळूज महानगरात घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश बदरकर (४१ रा. सी-१५ गाडेकर फुलरा, सिडको वाळूज महानगर-१) हे गुरुधानोरा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात नातेवाईकाचा साखरपुडा असल्याने १२ जुलै रोजी दुपारी घराला कुलूप लावून ते कुटुंबासह घराबाहेर पडले होते.
१३ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अविनाश यांच्या शेजारी राहणाऱ्या बापूसाहेब रोहकले यांनी अविनाश यांना फोन करून तुमच्या घरात चोर शिरल्याची माहिती देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांचे फुटेज पाठविले होते.
दरम्यान अविनाश यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांना त्यांच्या घराचे मुख्य सेफ्टी लॉक तुटलेले तसेच बेडरूम मधील कपाटातील ४ ग्राम वजनाचे सोन्याचे वेल, ९ ग्रॅम वजनाचे गंठण, १५ ग्रॅम वजनाचे लॉकेट, ७ ग्रॅमचे रिंग, दीड ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समजले. या प्रकरणी अविनाश बदरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार चोरटे सोसायटीमध्ये घुसून ते अविनाश बदरकर यांच्या घराकडे जाताना सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.