पुढारी ऑनलाईन डेस्क : इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी आघाडीची कंपनी ॲथर एनर्जी महाराष्ट्रात २ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी येथे हे गुंतवणूक होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अॅथर एनर्जीचे देशातील तिसरी फॅकट्री छत्रपती संभाजीनगर येथे साकारत आहे, यातून ४ हजार लोकांना रोजगार मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
२ हजार कोटींची गुंतवणूक
४ हजार नवीन रोजगार
'ॲथर'चा देशातील तिसरा कारखाना
दरवर्षी १० लाख स्कुटरी आणि बॅटरीची निर्मिती
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अॅथरचे संस्थापक स्वप्निल जैन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
अॅथरची ही फॅकट्री अत्याधुनिक तंत्रज्ञावर अधारित असेल, येथे दरवर्षी १० लाख वाहनांची आणि बॅटरी पॅकची निर्मिती केली जाणार आहे.
फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात व्यापार आणि उद्योगांना पुरक वातावरण आहे, हे यातून अधोरेखित झाले आहे. भारताच्या औद्योगिक विकासाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाशी सुसंगत अशी ही गुंतवणूक आहे," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंतीचे राज्य आहे. अॅथरने छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. समृद्धी महामार्गामुळे या भागातील कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे नेतृत्त्व करेल. तसेच या गुंतवणुकीमुळे या भागातील रोजगारसंधी वाढवेल, असे ते म्हणाले.