

Ashadhi Wari Sant Eknath Maharaj Palkhi 2026
छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीनिमित्त पैठण येथून संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (दि. ७) सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात चांदीच्या रथात नाथांच्या पादुका विराजमान असणार आहेत. या सोहळ्याची पैठणमध्ये जय्यत तयारी झाली आहे.
नाथांच्या या दिंडी सोहळ्याचे यंदाचे ४२७ वे वर्ष आहे. या सोहळ्यातील वारकरी आणि भाविक छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव व सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतून सुमारे २८५ किलोमीटरचे अंतर पायी मार्गक्रमण करणार आहेत. १९ दिवसांचा प्रवास करत हा सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. मराठवाड्यातील सुमारे ४० हजार वारकरी नाथांच्या या दिंडी सोहळ्यात दरवर्षी सहभागी होत असतात.
नाथांच्या या पालखी सोहळ्यात एकूण पाच रिंगण सोहळे रंगणार आहेत:
१० जुलै (दुपारी) : भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मिडसांगवी (जि. अहिल्यानगर) येथे पहिले रिंगण होईल.
१४ जुलै (दुपारी) : घुमरे पारगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे दुसरे रिंगण होईल.
१७ जुलै : नांगरडोह (जि. धाराशिव) येथे तिसरे रिंगण होईल.
२० जुलै : कव्हेदंड (ता. माढा, जि. सोलापूर) येथे चौथे रिंगण होईल.
२४ जुलै : पंढरपूर येथे पाचवे 'उभे रिंगण' तसेच पादुका आरती होणार आहे.
७ जुलै चनकवाडी (ता. पैठण), ८-हादगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), ९- लाडजळगाव, १०- कुंडल पारगाव (जि. बीड.), ११- मुंगसवाडे (ता. पाथर्डी), १२-राक्षसभुवन (ता. शिरूर कासार, जि. बीड), १३- रायमोह (जि. बीड), १४- पाटोदा (जि. बीड), १५- दिघोळ (जि. अहिल्यानगर) १६ खर्डा (जि. अहिल्यानगर), १७- दांडेगाव (ता. भूम), १८- अनाळे (ता. परंडा), १९- (परंडा), २०-(बिटरगाव, ता. माढा), २१- कुर्दू (ता. माढा), २२- अरण- करकंब (ता. पंढरपूर), २३ जुलै होळे (ता. पंढरपूर), २४ जुलै पंढरपूर.
विठूनामासाठी एसटीच्या २३५ जादा बसेसचा ताफा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे वारकऱ्यांचा जनसागर लोटतो. विठ्ठल भक्तांसाठी परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने वारकरी भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, या हेतूने यंदा विभागातून २३५ जादा बसेस विविध मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात तात्पुरत्या चार बसस्थानकांची उभारणी केली जाणार आहे. शहराबाहेरील प्रमुख मार्गांवर १२ तपासणी नाकेही तयार केले आहेत. बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वारकऱ्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये. यासाठी बसेसच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ब्रेकडाऊन पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. या अतिरिक्त उभारलेल्या यंत्रणेमुळे वारीच्या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यास मोठी मदत होणार आहे. एसटी प्रशासनातील सर्व अधिकारी, चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीची कामे आषाढीच्या वारी काळात २४ तास कार्यरत राहणार आहेत. तसेच, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना व दिव्यांग सवलती यांसारख्या शासनाच्या सर्व प्रवासी सवलती वारीच्या काळातही वारकऱ्यांना लागू राहतील.