

ashadhi wari marathwada connection pandharpur vitthal murti humpy
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा म्हणजे संतांची भूमी..संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई आदी एक ना अनेक.. आषाढी वारी आणि पंढरपूरशी मराठवाड्याचा जवळचा संबंध आहे. विजयनगरच्या राजाने पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती हंपी येथे नेली होती. परंतु पैठणच्या संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी भक्ती सामर्थ्याच्या जोरावर तेथील मूर्तीची पुन्हा पंढरपुरात प्रतिष्ठापना केली. त्यासंबंधीची कथा मोठी मनोरंजक आहे.
विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने विठ्ठलाची मूर्ती राजधानीत नेली होती. पंढरीच्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना ही मूर्ती आवडली आणि त्यावेळी सुरू असलेल्या इस्लामी आक्रमपणापासून मूर्ती सुरक्षित रहावी अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्याने विठ्ठलाचे सुरेख देऊळ तेथे बांधले. परंतु पंढरीत विठ्ठलच नसल्यामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली. आषाढीसाठी आलेले वारकरी हिरमुसले. तेव्हा संत भानुदास महाराजांनी मूर्ती परत पंढरपूरला आणूख दाखविल, असा .निर्धार केला आणि ते पायी चालत हंपीला पोहचले.
मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती दिसली. महाराजांनी स्पर्श करताच कुलुपे आपेआप उघडली आणि पहार्यावर असलेल्या सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराजांनी विठ्ठलाला पंढरीला येण्याचा आग्रह धरला. तेव्हा मूर्तीच्या गळ्यातील तुळशीचा आणि नवरत्नांचा हार त्यांच्या गळ्यात घातला. सकाळी काकड आरतीसाठी पुजारी आल्यानंतर त्याला नवरत्नांचा हार दिसला नाही.
ही माहिती राजाला कळाल्यानंतर त्याने चोर शोधा व त्याला ताबडतोब सुळावर चढवा असा आदेश दिला. पहारेकरी शोधाशोध करू लागले, तेव्हा हंपीच्या तुंगभद्रा नदीजवळ भानुदास महाराज स्नानसंध्या करीत होते. त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसल्यावर त्यांना पकडून सुळ्यावर चढण्याची तयारी सुरू झाली. त्याचवेळी भानुदास महाराजांनी विठ्ठलाचे स्मरण केले, त्यानंतर सुळाला आपोआप पालवी फुटली. ते म्हणाले, कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!
ही बातमी राजापर्यंत गेली. आपण ज्याला चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्भक्त आहे, हे राजाच्या लक्षात आले. त्याने मूर्ती महाराजांकडे सुपुर्द केली. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. दुसर्या एका दंतकथेनुसार विठ्ठलानेे अंगुष्ठ रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांनी रथातून त्यांची मिरवणूक काढली.
मूर्ती पुन्हा बाहेर जाऊ नये म्हणून भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. तसेच हंपीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही महाराजांनी केली. तेव्हा त्यांना विठ्ठलाने दोन वर दिले. तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील. त्याप्रमाणे शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज हे नाथांच्या वंशात जन्मास आले. दुसऱ्या वरानुसार सोळाखांबीजवळ संत भानुदास महाराजांची समाधी आहे.