

छत्रपती संभाजीनगर : आषाढीचे वातावरण सुरू झाले की, घराघरात पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘माझे माहेर पंढरी’चे स्वर घुमू लागतात. भीमसेनजींनी हा अभंग अजरामर केला खरा, परंतु मराठवाड्याच्या भूमीत सोळाव्या शतकात अवतरलेल्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांना हा अभंग सुचला आणि चारेश वर्ष उलटूनही या अभंगाची लोकप्रियता कायम आहे.
माझें माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक आहे बंधू । त्याची ख्याती काय सांगूं ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनीं शरण । करी माहेरची आठवण ॥५॥
या रचनेत महाराजांनी पंढरीला आपले माहेर म्हटले आहे. भीमा म्हणजे भीवरा नदी. ती वाहताना पंढरपूर जवळ थोडी वळून वाकून चंद्राकृती होते. तेंव्हा तिला चंद्रभागा म्हणतात. भगवान श्री पांडुरंग माझे वडील आणि रूक्मिणी देवी माझ्या मातोश्री आहेत, पुंडलिक हे माझे बंधू असून त्याची कीर्ती जेवढी सांगावी तेवढी थोडीच आहे. माझी बहिण ही चंद्रभागा आहे. तिच्यामध्ये स्नान केले असता ती सर्व पापे नाहीशी करते. माझ्या सद्गुरूंना शरण गेल्यामुळे या आप्तजनांची मला सतत आठवण येते, असा या अभंगाचा आशय आहे.
हा अभंग पंडितजींनी सर्वप्रथम सादर केला १९७७ मध्ये. काही मंडळी १९६० चाही हवाला देतात. ७७ मध्ये अल्बमच्या स्वरूपात आला असे सांगितले जाते. या अभंगाला राम फाटक यांनी संगीत दिले होते. हा अभंग रेकॉर्ड प्लिअर, टेपरेकॉर्ड या जुन्या साधनांप्रमाणेच आता यूट्यूबवरही हिट ठरला आहे.
विशेषत: आषाढी, कार्तिकीच्या काळात मराठी माणासाच्या घराघरांत अभंगाची धून ऐकू येते. या अभंगावर नेटकर्यांच्या प्रतिक्रियाही तेवढ्याच भावूक आहेत. जगातील सर्वात गोड लोकप्रिय अंभग, संतांच्या सहवासात नेणारा अभंग, मन प्रसन्न करणारा, अप्रतिम अशा एका अनेक प्रतिकिया पाहावयास मिळतात.
संस्कृत, हिंदीप्रमाणेच अन्य प्रांतीक भाषेतही या अभंगाचा अनुवाद करण्यात आला आहे. शंकर महादेवन, महेश काळे, राहुल देशपांडे आदी गायकांनी हा अभंग वेगवेगळ्या स्वरूपात सादर केला आहे. सवाई गंधव महोत्सव व अन्य संगीत महोत्सवात मान्यवर गायकांची या अभंगावर जुगलबंदी अनेकवेळा रंगली आहे.