

Arapur additional industrial estate to be built on 753 hectares
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
१९८० च्या दशकातील वाळूज औद्योगिक वसाहत उद्य-ोगांनी फुल्ल झाली आहे. बजाज कंपनीनंतर ही वसाहत झपाट्याने विकसित झाली. त्यामुळे नवउद्योगांसाठी जमिनीची मागणी सुरू होती. याच अनुषंगाने शासनाने नवीन औद्योगिक वसाहतीसाठी मौजे आरापूर, गवळी शिवरा येथील ७५३ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. यासंबंधीचे आदेश २ जून २०२५ रोजी काढण्यात आले. आता लवकरच या क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.
वाळूज औद्योगिक वसाहत हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. संभाजीनगरच्या विकासात येथील उद्योगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अनेक नवउद्योगांना वाळूज एमआयडीसी आकर्षित करत आहे. परंतु वाळूजचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला नाही. त्यामुळे जागा नसल्याने अनेक लघु उद्योजकांना खासगी प्लॉटवर उद्योग करावे लागत आहे.
अशा प्लॉटवर त्यांना आवश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यात अनेक स्टार्टअपही प्रतीक्षेत असल्यामुळे अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहतीची मागणी सुरू होती. त्यानुसार प्रस्तावही एमआयडीसीच्या मुंबई कार्यालय आणि शासनाकडे पाठवला होता. त्यास शासनाने मंजुरी देत आरापूर, सुलतानाबाद गवळी शिवरा येथील ७५२.४३ हेक्टर (१८५७ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केली आहे. यात आरापूर १६९.४०, गवळी शिवरा ४०५.४१ तर सुलतानाबाद १७७.६२ हेक्टर जागा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी जाहीर केली आहे.
आरापूर औद्योगिक वसाहतीत सुमारे अडीच हजारांहून अधिक उद्योगांसाठी भूखंड आणि सुमारे २ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. सध्या वाळूज एमआयडीसीमध्ये १ हजार ५ ६३ हेक्टरवर ३५०० उद्योग आहेत. यातून ३ लाख कामगारांना रोजगार मिळत आहे.
अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने मौजे आरापूर व गवळी शिवरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. याची अधिसूचना २ जून २०२५ रोजी काढण्यात आली आहे. लवकरच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भूसंपादन केले जाईल. भूसंपादनानंतर वर्षभरात पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल.