

Anti-encroachment drive on the Khultabad–Sharanapur road
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील महामार्गाच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईला सुरुवात केली.
खुलताबाद टी-पॉइंट येथील संजरी हॉटेलपासून शेरणापूर टी-पॉइंटजवळील दौलताबाद मिलन मिठाईपर्यंतच्या मार्गावरील तब्बल १९९ अतिक्रमणे प्रशासनाच्या निशाण्यावर आहेत. या मोहिमेमुळे महामार्गालगतच्या व्यावसायिकांमध्ये मोठी उडाली खळबळ आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्तराष्ट्रीय महामार्गाची हद्द आणि नियंत्रित क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कनिष्ठ अभियंता पुष्पा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चार अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ११ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच एक जेसीबी, एक सुपरवायझर आणि सात मजुरांचे पथक कारवाईसाठी सज्ज होते.
अपघातांचा धोका कमी होणार? महामार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे, टपऱ्या, हॉटेल्स, फलक, पार्किंग आणि इतर अडथळ्यांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्याची उपलब्ध जागा कमी झाल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोकाही वाढला होता. महामार्गाची हद्द मोकळी झाल्यास वाहतुकीला अधिक मोकळीक मिळणार आहे.
उर्वरित अतिक्रमणांवर प्रशासनाची नजर एकूण १९९ अतिक्रमणे हटविण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून, पहिल्याच दिवशी काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून माघार घेतली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. उर्वरित अतिक्रमणांवर प्रशासन पुढील टप्प्यात कोणती भूमिका घेते, याकडे व्यावसायिकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कारवाईच्या धास्तीने अनेकांची माघार
संजरी हॉटेल परिसरातून कारवाईला सुरुवात होताच महामार्गालगत असलेल्या टपऱ्या, शेड, दुकाने आणि इतर बांधकामांची तपासणी करण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईचा अंदाज आल्याने अनेक अतिक्रमणधारकांनी जेसीबीची वाट न पाहता स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी अतिक्रमणे हटविण्यास टाळाटाळ झाल्याने प्रशासनाने जेसीबी व मजुरांच्या मदतीने थेट कारवाई केली.