

Anti-encroachment drive on all DP (Development Plan) roads in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासह रस्त्यांची उपलब्ध रुंदी कायम ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता व्यापक पातळीवर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे एखाद्या ठरावीक रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता विकास आराखड्यातील (डीपी) शहरभरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती सोमवारी (दि.१६) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रमुख मार्गावर वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक रस्त्यांची संयुक्त मोजणी करण्यासाठी महापालिकेने सिटी सर्व्हे कार्यालयाकडे प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आवश्यक शुल्कही भरण्यात आले आहे.
मोजणीनंतर रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या मालमत्तांची निश्चिती करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या प्रस्तावित रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणची अतिक्रमणे आणि घरे बाधित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही मालमत्तांचे संपादन करण्यात आले असून, संबंधित मालमत्ताधारकांना मोबदलाही वितरित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, नव्या विकास आराखड्यात शहरातील ४२ रस्त्यांची प्रस्तावित रुंदी कमी करण्यात आली आहे. तरीही वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापूर्वी शहरातील रस्त्यांवर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमांनंतरही काही ठिकाणी पुन्हा अडथळे निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत.
तसेच दुकानांसमोर ठेवण्यात येणाऱ्या हातगाड्या व साहित्यामुळे रस्त्यांची जागा व्यापली जात आहे. त्यामुळे आता डीपी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याबरोबरच रस्त्यांच्या मोकळ्या जागेचा वापर पुन्हा अतिक्रमणासाठी होणार नाही, याकडेही प्रशासन लक्ष देणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सर्व डीपी रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
डीपी रस्ते अतिक्रमणमुक्तीचे उद्दिष्ट
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. यासाठी संयुक्त मोजणी, आवश्यक तेथे भूसंपादन आणि अतिक्रमण हटाव ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.