छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऊर्जा विभागाने वीज कर्मचारी, अभियंता व अधिकारीवर्गाला १९ हजार रुपये, तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. वीज कर्मचारी संघटनेने ९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्याने कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आचारसंहिता लागणार असल्यामुळे अनेक कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सहाय्यक यांच्या मनामध्ये यावर्षी बोनस मिळतो किंवा नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन नेतृत्वास पूर्ण विश्वास होता की, सुरू केलेली परंपरा खंडित होऊ देणार नाही. संघटनेच्या नेतृत्वाने सातत्याने ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क ठेवला होता.
महाराराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीनेसुद्धा बोनस देण्याबाबत पत्र देऊन या मागणीचा पाठपुरावा सरकार व व्यवस्थापनाकडे केला. त्यामुळेच ऊर्जा विभागाने सानुग्रह अनुदान जाहीर केल्याने तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाचे संघटनेने आभार व्यक्त केले आहे.