

बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी १५ मे रोजी झालेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी (दि. २७) मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाकडून एन्काऊंटर करण्यात आला. अमोल खोतकर (रा. पडेगाव) असे ठार झालेल्या आरोपीचे नाव असून, तो दरोडा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एन्काउंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अमोल खोतकर याची बहिणी रोहिणी खोतकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या “माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की त्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, जी एका श्रीमंत व्यक्तीने दिली आहे. मी घरी आलो नाही तर समजून जा संपवले आहे, असं तो सतत म्हणायचा,”
दरम्यान, पोलिसांनी पहाटे अमोल खोतकर यांच्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली. पोलिसांनी काहीही सापडलं नाही, पण जेव्हा अमोल कुठं आहे असं विचारलं, तेव्हा किरकोळ जखमी आहे असल्याचं खोटं सांगितलं. प्रत्यक्षात तो मृतावस्थेत सापडला,” असा खळबळजनक आरोप रोहिणी खोतकर यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, “एन्काउंटर केला असता तर पायावर गोळी का नाही मारली? थेट छातीत गोळी झाडण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?”
त्या पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी कोऱ्या कागदांवर खूप सह्या घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “या सह्यांमुळे मी भविष्यात अडचणीत आले तर मला मदत करावी,” अशी भावनिक विनंती त्यांनी प्रसारमाध्यमांकडे केली. “या प्रकरणात जे लोक सहभागी आहेत ते सर्व श्रीमंत आहेत, त्यांना चोरी करण्याची गरज नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “माझा भाऊ निर्दोष होता, मला न्याय मिळाल्याशिवाय मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खोतकर वडगाव कोल्हाटी परिसरातील साई गार्डन लॉजिंग येथे येणार होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव-साजापूर रोडवर सापळा रचला होता. रात्री सव्वाअकरा वाजता सुमारास एक संशयित कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, कारचालकाने वाहन न थांबवता ते पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत गोळीबार केला आणि अमोल खोतकरचा जागीच मृत्यू झाला. “एन्काऊंटरची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकारी देतील,” असे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.