

Ambassadors of 35 countries will arrive in Sambhajinagar city today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून शहरातील मुख्य मार्गांची साफसफाई करण्यात येत असून, विद्युत खाबांना रंगरंगोटी करून मेकअपचा थर चढवला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वप्रथम अंजिठा-वेरूळ लेणीचा समावेश करण्यात आला होता.
त्यामुळे जगातील ३५ देशांचे राजदूत आज शुक्रवारी (दि.२१) दाखल होत आहेत. जागतिक पातळीवर शहराची चमक दाखवण्याऐवजी महापालिकेने या संधीचे रूपांतर 'मेकअप शो' मध्ये केल्याची चर्चा आहे. शहरातील मार्गांवर अर्धवट स्थितीतील इमारती, धुळीचे साम्राज्य आणि मलव्याचे ढिगार पाहुण्यांच्या नजरेतुन सुटतील का, या चर्चेला ऊत आला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अजिंठा-वेरूळ लेण्यांचा समावेश झाला आहे. अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांचा ओघ कायम असतो. विदेशी पर्यटकांना अद्भुत कलेचा वारसा सांगणाऱ्या या लेणींचा गौरव होणार असून, जगभरातील ३५ राष्ट्रांचे राजदूत आजपासून दोन दिवस शहरात मुक्कामी येत आहेत.
शहराच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विविध देशांचे राजदूत शहरात येत असल्याने जिल्हा प्रशासनासह मनपान झटपट सजावट मोहीम राबवत शहरातील मुख्य मार्गावरील पथदिव्यांच्या पोलला नवीन रंग, रस्त्यांच्या मध्यभागी झटपट साफसफाई केली जात आहे. हे दृश्य बाहेरून पाहता चकाचक वाटत असले तरी यातील काही मार्गालगत रस्ता रुंदीकरणासाठीच्या पाडकामानंतर रस्त्यालगतच पडून असलेले मलव्याचे ढिगार, विटांच्या तुकड्यांचा खच, तुटलेली लोखंड आणि अर्धवट पाडलेल्या इमारती पाहुण्यांच्या नजरेतून सुटतीलच, असे नाही. त्यातच महापालिकेच्या स्वच्छता विभागाने केवळ राजदूतांच्या फेरफटक्याच्या काही मुख्य रस्त्यांचीच धूळ झटकली असून, बाकीचे वळण रस्ते, वस्त्या आणि पाडपाडीमुळे अस्ताव्यस्त झालेले भाग सगळे दुर्लक्षित ठेवले आहेत.