

Winter season begins: Hurda party excitement
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थंडी वाढू लागताच, ग्रामीण महाराष्ट्राची खास ओळख असलेली हुरडा पार्टी शहरालगतच्या शेतांमध्ये आणि फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. ज्वारीचे कोवळे आणि रसदार दाणे भाजून खाण्याचा हा आनंद घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकर शेताच्या बांधावर गर्दी करू लागले आहेत.
यंदाच्या हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याने, शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्रांनी हुरडा पार्थ्यांसाठी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी मुबलक हुरडा उपलब्ध आहे, अशी माहिती हुरडा पार्टी आयोजकांनी दिली.
शहरापासून जवळच पैठण रोड, अहिल्यानगर रोड, चिकलठाणा परिसर, दौलताबाद रोड हे आता हुरडा पार्टीचे जणू हब झाले आहेत. शहरात आणि शहराच्या आसपास ग्रामीण भागात जवळपास यंदा ५० हून अधिक हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पाहता आयोजकांनी ६०० ते ८०० रुपये पासून हुरडा पार्टी ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. यावर्षी कुठल्याही प्रकारच्या किमती वाढविल्या नाही.
कारण पाहता यंदा पाऊस चांगला झाल्याने हुरडा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यावर्षी थंडीही चांगली आहे. त्याचा परिणाम हुरडा पार्टी व्यावसायिकांना चांगला फायदा होणार आहे.
पारंपरिक मेजवानी
हुरडा पार्टीचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्वारीचे कोवळे कणीस शेकोटीवर भाजून त्यातून गरम-गरम हुरडा खाणे. यासोबतच अस्सल गावरान पदार्थांची मेजवानी असते. तीळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या चटण्या (ठेचा), गरम वांग्याचे भरीत, कांदा-लसूण आणि टोमॅटोची भाजी, बाजरीची भाकरी, गूळ, लोणी, पिठले-भाकरी आणि सोबत रानमेवा मध्ये बोरे, पेरू यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक कुटुंबासह आणि मित्रमंडळींसह शेतशिवारात दाखल होत आहेत.
याबरोबरच बैलगाडी, खेळ यासह मनोरंजन आणि सोबतच शेकोटी, असे ग्रामीण वातावरणही अनुभवायला मिळावे यासाठीही तयारी केली जात आहे. शहरी जीवनातून थोडा ब्रेक घेऊन, मोकळ्या वातावरणात, ग्रामीण संस्कृतीची अनुभूती घेण्याचा अनुभव या पाट्र्त्यांमध्ये मिळतो.
कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या या संकल्पनेमुळे पर्यटकांना अस्सल मातीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेता येतो. आगामी काळात थंडी आणखी वाढेल, तसा हुरडा पार्टीचा हा उत्साह अधिक शिगेला पोहोचणार आहे. काहींनी शहरातच रानमेवासह अस्सल गावरान पद्धतीने हुरडा पार्टीचे आयोजन करण्यावरही भर दिला आहे. त्यामुळे यंदा थंडीत हुरडा पार्टीची शहरवासीयांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे.