

Ambassadors from 35 countries will visit the Chhatrapati Sambhajinagar city for two days in November
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरात नोव्हेंबरमध्ये दोन दिवस ३५ राष्ट्रांचे राजदूत येणार असून संयुक्त राष्ट्रसंघाला ७५ वर्षे वर्षे पूर्ण होत असल्याने जागतिक वारसा स्थळ म्हणून सर्वात प्रथम समावेश झालेल्या अजिंठा-वेरूळ लेणी ते भेट देणार आहेत. यात प्रामुख्याने चीन, फ्रान्स या देशांच्या राजदूतांचा समावेश असणार आहे. त्यासाठी शहरातील विविध विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावेत, अशा सूचना गुरुवारी (दि. २५) मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केल्या आहेत.
स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत माहिती देताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांचा समावेश झाला आहे. या लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांचा ओघ कायम असतो.
विदेशी पर्यटकांना अद्भुत कलेचा वारसा सांगणाऱ्या लेणींचा गौरव होणार आहे. यावेळी जगभरातील ३५ राष्ट्रांचे राजदूत २१ ते २३ नोव्हेबर दरम्यान दोन दिवस शहरात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राजदूतांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यासाठी लागणारा निधीही मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शहरातील विविध विकास कामे तातडीने पूर्ण करावीत, रस्ते, चौक चकचकीत करावेत, रस्त्यांसह उड्डाणपूल, चौका चौकात सुशोभीकरण व सौदर्याकरण करून विद्युत रो-षणाई करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी ३५ विविध देशांचे राजदूत प्रथमच एकत्रित येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व सुविधा पुरवण्याकडे शहर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार.