

86 people have died due to rain so far
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात यंदा पावसाने अभूतपूर्व नुकसान घडविले आहे. महसुली नोंदीनुसार, पावसामुळे जूनपासून आतापर्यंत विभागात तब्बल ८६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच १६८३ जनावरे दगावली आहेत. शिवाय २४ लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यातील ७५ टक्के म्हणजे १८ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती प्रभारी महसूल अप्पर आयुक्त संभाजीराव अडकुणे यांनी दिली.
मराठवाड्यात जून महिन्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांत वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेली खरिपाची पिके गेली, ठिकठिकाणी घरांची पडझड झाली, पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झाली आहे. महसूल विभागाने या चार महिन्यांतील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी एकत्र केली आहे. त्यानुसार जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात खरिपाच्या तब्बल २३ लाख ९६ हजार १६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातील १८ लाख २० हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे प्रमाण ७५ टक्के इतके आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख ५४ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. धाराशिव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर शेती पिके बाधित झाली आहेत. तर दुसरीकडे जूनपासून आतापर्यंत विभागात तब्बल ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात २६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५, हिंगोली ११, बीड जिल्ह्यांत ११ जणांनी जीव गमावला आहे. तसेच जालना जिल्ह्यात ७, परभणी जिल्ह्यात ६, लातूर जिल्ह्यात ६ आणि धाराशिव जिल्ह्यातही ४ जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे.
घरांची पडझड, ५८१७ कुटुंब उघड्यावर
पावसामुळे मराठवाड्यात कच्च्या आणि पक्क्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत एकूण सर्व प्रकारच्या ५८१७ घरांची पडझड झाली आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यातच २२२४ घरे पडली आहेत. तर लातूर जिल्ह्यात १२३४ घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय विभागात जनावरांचे २९४ गोठेही बाधित झाले आहेत.