

नाशिक : शेतकरी जीवनयात्रा संपविलेल्या कुटुंबीयांना सांत्वनपर आधार देण्यासाठी शासनाकडून मदतीचा हात दिला जातो. अशा वर्षभरातील घटनांची प्रकरणे महसूल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बैठकीच्या पटलावर घेण्यात आली. त्यातील पाच प्रकरणे निकाली काढून संबंधितांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात मालेगाव, बागलाण तालुक्यातील दोन, तर निफाड तालुक्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत गतवर्षीच्या शेतकरी जीवनयात्रा संपविल्याची प्रकरणे तपासण्यात आली. पाच शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मदत तहसील कार्यालयामार्फत सप्ताहभरात वितरित केली जाणार असून, त्यातील ७० हजार रुपये पोस्ट खात्यात, तर ३० हजार रुपये मुदतठेव स्वरूपात जमा करण्यात येणार आहेत.
कै. संतोष दशरथ निरभवणे (रा. जळगाव ता. निफाड), कै. कारभारी गुंडाजी ठोंबरे (रा. रावळगाव, ता. मालेगाव), कै. प्रवीण प्रेमनाथ हिरे (रा. निमगाव, ता. मालेगाव), कै. मुकेश दिलीप अहिरे (रा. ब्राह्मणगाव, ता. बागलाण), कै. कैलास श्रावण गायकवाड (रा. तळवाडे भामेर, ता. बागलाण).