

Akhil Malak in the net of the Crime Branch
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुजरात येथून सिरपचा साठा मागवून शहरातील पेडलर्सना नशेसाठी पुरवठा करणाऱ्या टोळीचा मोहरक्या सय्यद अखिल हुसैनी ऊर्फ अखिल मालक (३६, रा. सिल्क मिल कॉलनी) याला अखेर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्याचे दोन साथीदार अंधा फिरोज आणि अयान शेखला एनडीपीएसच्या पथकाने ८ डिसेंबरला अटक केली होती. तेव्हापासून अखिल हा पोलिसांना चकवा देत होता.
गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एमआयटी कॉलेजच्या चौकात एपीआय मेनकुदळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, छावणी पोलिस ठाण्यातील गुंगीकारक औषध विक्री प्रकरणातील वॉन्टेड आर ोपी अखिल मालक हा बजाज हॉस्पिटलसमोरील मोकळ्या मैदानात संशयास्पदरीत्या उभा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.
आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. अखिलची कसून चौकशी केली असता, त्याने यापूर्वी अटक झालेल्या सय्यद फिरोज उर्फ अंधा सय्यद अकबर आणि अयान शेख चांद शेख यांना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आपणच पुरवल्या असल्याची कबुली दिली.
त्याला छावणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सपोनि जगन्नाथ मेनकुदळे, अंमलदार शोण पवार, सुनील पाटील, सुनील जाधव, दीपक शिंदे आणि वाडीलाल जाधव यांच्या पथकाने केली.
गुजरातची आयशा कुठे आहे ? अखिल मालक हा नशेचे रॅकेट चालवितो. स्वतः तो कधीही समोर येऊन धंदा करत नसल्याने तो यापूर्वी पोलिसांच्या तावडीत आला नव्हता. मात्र तो गुजरातच्या आयशाकडून सिरपचा माल मागवून शहरात पुरवठा करतो. फेरोज हा त्याचा पार्टनर असून, आयान हा पेडलर आहे. एक बाटली ४०० रुपयांना विक्री करायचे. यात मोठ्याप्रमाणात तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढले जात असल्याचेही समोर आले होते.