

After heavy rain in Marathwada, tanker passes four hundred
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद झालेली असूनही अनेक गावांत चारशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हा पुरवठा टैंकर लॉबीला पोसण्यासाठी सुरू आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४८ गावे व २३ वाड्यांना २२८ तर जालना जिल्ह्यातील १०९ गावे व २३ वाड्यांना १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, सर्वाधिक टँकर या दोन जिल्ह्यांत सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
भर पावसाळ्यातही मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई असून, छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर बनली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. यासह जालना व अन्य जिल्ह्यांतील अनेक गाव-वाड्यांतून टँकरची मागणी वाढत गेली. मे अखेर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७३ गावे व १४९ वाड्यांना ५७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
यात सर्वाधिक म्हणजे २७३ टैंकर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू होते. दरम्यान, मध्यंतरी मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाला. मात्र जलाशयात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायम असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलेल, अशी आशा होती. मात्र नियमित जलस्रोतांमध्ये उपयुक्त जलसाठा पुरेसा नसल्याने पाणीटंचाईची दाहकता कायम आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४८ गावे व २३ वाड्यांना २२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तर जालन्यातील १०९ गावे व २३ वाड्यांना १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासह परभणी जिल्ह्यातील ४ गावे व १ वाडीला ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील १ गाव व ३ वाड्यांना २ टँकरद्वारे तर नांदेड जिल्ह्यातील ३ गावे आणि ६ वाड्यांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशा प्रकारे विभागातील या पाच जिल्ह्यांतील २६५ गावे व ५६ वाड्यांना मिळून ४२४ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. धाराशिव, लातूर, बीड जिल्हे आजघडीला टँकरमुक्त झाले आहेत.
पावसाळा सुरू झाला आहे. मात्र मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २० जूनच्या अहवालानुसार मराठवाड्यातील १ हजार २०६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५०, जालना २३४, परभणी ६६, हिंगोली १२१, नांदेड ४०६, बीड १०२, लातूर ९०, आणि धाराशिव जिल्ह्यात ३७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी २०३ गावांतील २५३ विहिरींचे तर टैंकर व्यतिरिक्त ७५३ गावांतील ९५३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.