

छत्रपती संभाजीनगर : अधिक मासानिमित्त (धोंड्याचा महिना) जावयाचे मानपान सुरू आहे. यानिमित्त वाण म्हणून ३३ अनारसे देण्याची मोठी परंपरा आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे मिठाई दुकानांमध्ये, घरगुती उत्पादक आणि बचत गटांकडे अनारशांना प्रचंड मागणी वाढली आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ३३ चा आकडा होय. अधिक मास ३३ महिन्यांनी येतो, त्यामुळे जावयाला ३३ अनारसे, बत्तासे वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. अनारसे हे घरी तयार करणे जरासे अवघड असल्याने महिला बाज-ारातून किंवा गृहोद्यांगाकडून विकत घेत आहे. बाजारात अनारश्यांचा दर साधारणपणे ६०० ते ७५० रूपये प्रति किलो आहे.
दुकानांमधील तयार अनारशांपेक्षा बचत गटांच्या माध्यमातून आणि घरगुती पद्धतीने बनवलेल्या (शुद्ध तुपातील) अनारशांना ग्राहकांची विशेष पसंती असते. अनारशांच्या बरोबरीने तांबे पितळेचे भांडे किंवा चांदीचे ताट आणि जावयाच्या कपड्यांचा आहेर देण्याची देखील प्रथा आहे.
अधिक मासात अनेक सुवासिनी लेक-जावयाला घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात अनारसे बनवणारे कारागीर आणि मिठाई विक्रेते यांच्याकडे आगाऊ ऑर्डर नोंदवण्याची मोठी लगबग दिसून येत आहे.
असे आहेत दर...
तेलातील ३३ अनारसे ३५० रुपयांना, तर तुपातील ३३ अनारसे ४५० रुपयांना आहेत. शिवाय एक किलो अनारशासाठी ६०० ते ७५० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच अनारशाचे पीठ २०० रुपये किलो आहे.
अनारसे बनविताना तांदूळ, गूळ यांचे प्रमाण चुकल्यास ते बिघडतात. त्यामुळे तयार अनारशांना अधिक मागणी आहे. सध्या तेल व तुपाचे भाव वाढल्याने अनारशांचे भावही वाढले आहे.
आरती दिवटे, गृहोद्योजिका