

Additional water supply to Kannad from Shivna-Takli
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या शिवना टाकळी अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेस आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे ५६ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार संजना जाधव यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा शहराच्या योजनेसाठी आमदार संजना जाधव यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने प्रकल्पाचे महत्व वाढले आहे.
सध्या अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा शहराची लोकसंख्या सध्या ५० हजारांच्या आसपास असून शहराला सध्या अंबाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दुष्काळी परिस्थिती किंवा कमी पावसाच्या काळात अंबाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्याने शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
शहरासाठी भविष्यातील पाणी गरजांचा विचार
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा व भविष्यातील पाणी गरजांचा विचार करून शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. या योजनेस आता ५६ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कन्नड शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना कृउबा सभापती डॉ. मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, खरेदी विक्री संघ सभापती ज्ञानेश्वर निकम, शहरप्रमुख राम पवार, नगरसेवक प्रकाश पिरथानी, सतीशदादा चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष सोनाली धाटबळे, संचालक साईनाथ आल्हाड, पं.स. सदस्य सिद्धेश्वर झाल्टे, शरद जाधव, रामेश्वर धनकर, प्रवीण राठोड, आकाश बोलधने, रत्नाकर पंडित, आदित्य गर्ने पाटील, अशोक वाळुंजे, माजी पं. स. सदस्य किशोर पवार, संतोष पवार, अरविंद राठोड, सरपंच रवी राठोड, श्रीराम घुगे, जगन जंगले, साळुबा उबाळे, गणेश सोळुंके, संतोष जैस्वाल, सतीश खडेकर, हर्षवर्धन निकम, सोमनाथ जाधव आदींनी व्यक्त केली-