

Action will now be taken if drinking water is used for construction work
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात पाण्याची टंचाई तीव्र होत असताना बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या बिल्डरांनो, सावधान, बांधकामासाठी नळाचे, विहीर किंवा विंधन विहिरीतील पाण्याचा वापर टाळा, त्याऐवजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) पाण्याचा वापर करा.
हे पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाईल. बिल्डरांनी स्वतः टँकरची व्यवस्था करून पाणी घेऊन जावे, असे स्पष्ट निर्देश गुरुवारी (दि. १५) स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी दिले. त्याचवेळी पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
अपुरा पाऊस, पाण्याची वाढती मागणी आणि एल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य तापमानवाढीची शक्यता लक्षात घेता शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नगररचना, पाणीपुरवठा आणि शहर अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील पाणीटंचाईसह बांधकाम क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
तसेच शहरात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले असून, दुसरीकडे मोठ्या आणि छोट्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. काही बांधकामांच्या ठिकाणी विहीर आणि विंधनविहिरीतील पाणी वापरले जात असून, काही ठिकाणी थेट नळाच्या पाण्याचाही वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी बोअरवेल, हापसा किंवा पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध असले, तरी त्यांचा वापर टाळावा.
भूगर्भातील पाण्याची पातळी आधीच खालावण्याची शक्यता असताना बांधकामांसाठी भूजलाचा उपसा केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी जबाबदारीने पाण्याचा वापर करावा, असे मकरिये यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बांधकामांसाठी आवश्यक असलेले प्रक्रियायुक्त पाणी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा असा वापर टाळून उपलब्ध जलस्रोतांचे जतन करावे, असे मकरिये यांनी यावेळी स्पष्ट केले.
पार्किंग गिळणाऱ्या बिल्डरांवर कारवाईचे आदेश
शहरातील इमारतींच्या पार्किंगसाठी मंजूर असलेल्या जागांवरच कालांतराने बांधकामे केली जात असल्याने रहिवासी आणि व्यावसायिकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी पार्किंगच्या जागा नियमानुसार मोकळ्या ठेवल्या आहेत की नाही, याची काटेकोर तपासणी करावी. पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकामे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देशही मकरिये यांनी या बैठकीत दिले.
नो-नेटवर्क भागांत टँकरने पाणीपुरवठ्याचे निर्देश
शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. यात पडेगाव, मिटमिटा, सातारा-देवळाई, चिकलठाणा, सुंदरवाडी आणि हसूल परिसरातील नो-ने-टवर्क भागांत टँकरची संख्या वाढवून तातडीने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश देण्यात आले. ज्या भागांतील जलकुंभांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे, त्या भागांत जलवाहि-न्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.