पैठण: क्रीडा मैदान भूखंडाचे ‘श्रीखंड’ करणाऱ्यांवर कारवाई करा- अशी मागणी करत क्रिडाप्रेमींचे उपोषण
पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण शहरात एकमेव असलेलं शासकीय क्रीडा विभागाच्या मैदानाचे भूखंडाचे श्रीखंड करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करा. तसेच 'खेळाडूंचे मैदान अतिक्रमण मुक्त करा' या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१५) सकाळी क्रीडाप्रेमींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पैठण शहरातील शासकीय क्रीडा विभागाच्या अंतर्गत असलेल्या स्व. दिगंबरराव कावसानकर क्रीडा मैदानावर क्रीडा अधिकारी, महसूल विभागाचे तत्कालीन तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी यांनी संगणमत केले. यानंतर क्रीडांगणाच्या मैदानातून परमिट रूम, मंगल कार्यालयासाठी एका हॉटेल मालकाला बेकायदेशीर रस्ता निर्माण करून देण्यात आला आहे.
या बेकायदेशीर प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी. तसेच खेळाडूंचे मैदान अतिक्रमण मुक्त करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१५ सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, महेश जोशी, श्रीराम आहुजा, श्रीनाथ गोसावी महाराज, विजय सुते, अजय परळकर, कपील कावसानकर,ॲड प्रमोद सरोदे, प्रसाद लोळगे, राजेंद्र पातकळ, निसार बागवान,विजय गव्हाणे, शिवनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर क्रीडाप्रेमीने उपोषण मध्ये सहभाग घेतला आहे.

