

Action against those who vote twice
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : नगर परिषद निवडणुकीत दुबार मतदान केल्याचे सिद्ध झाल्यास अशा मतदारांवर तसेच बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी दिला.
दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सभागृहात माध्यम प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत, सुभाष गायकवाड, चिकलीकर, सुनील भाग्यवंत उपस्थित होते.
यावेळी डॉ. जहऱ्हाड यांनी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने चार ठिकाणी तपासणीसाठी नाके उभारल्याचे सांगत माध्यम प्रतिनिधीसाठी असलेल्या शासनाच्या गाईड लाईनबाबत माहिती दिली. माध्यम प्रतिनिधिसाठी ओळ खपत्र, मतदान केंद्रावरील प्रवेश कुणाला मिळणार, छायाचित्र काढणे याबाबत असलेल्या निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांची माहिती दिली.
रणजित चव्हाण यांनी दुबार मतदानाबाबत निवडणूक अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. यावर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जहऱ्हाड व सुनील सावंत यांनी समाधानकारक उत्तरे दिली. दुबार मतदारांची नावे आढळ्यास विशिष्ट परिशिष्टमध्ये संबंधित मतदारांची कनसेन्ट म्हणजे मतदान कुठे करणार याबाबत परवानागी घेतली जाते. तसेच दुबार मतदान करणार नाही, असे लिहूनही घेतले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषद अधिकारी सुभाष गायकवाड यांनी निवडणूक खर्चाबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.