

A young man was stabbed on Adalat Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
मित्रासोबत पायी निघालेल्या तरुणावर अज्ञात दोघांनी जीवघेणा हल्ला केला. फूटपाथवर समोरून येऊन थेट पोटात चाकू खुपसला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अदालत रोडवरील कासलीवाल मैदानासमोर घडली. हाकेच्या अंतरावर असलेल्या महावीर चौकात पोलिसांकडून रिक्षांवर नियमित कारवाई सुरू होती. चाकूसह आरोपी त्याच चौकाच्या दिशेने पसार झाले, हे विशेष. या हल्ल्यात गौरव संजय मावस (२३, रा. मांगेगाव, ता. गंगापूर) हा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत फिर्यादी विजय गोरख साळुंके (२१, रा. मांगेगाव, ता. गंगापूर) याच्या तक्रारीनुसार, तो गौरव सोबत बाबा चौकातून अदालत रोडवरील कासलीवाल मैदानाच्या बाजूने न्यायालयाच्या दिशेने फूटपाथवरून पायी जात होता. त्याच वेळी त्यांच्या समोरून दोन जण पायी आले. त्यातील एकाने गौरवच्या पोटात आणि छातीत चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
वार केलेला चाकू घेऊन दोघेही बाबा चौकाच्या दिशेने पळून गेले. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या विजयने त्याला गौरवचा न्यायालयात असलेला मामा अभिजित साळवे यांच्याकडे तो जखमी अवस्थेत घेऊन गेला. परंतु मामा तिथे नसल्याने त्याला न्यायालयातील रुग्णालयात नेऊन तेथून पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते, त्याची अंदाजे उंची ५.६ फूट होती. दुसऱ्या आरोपीने टी शर्ट परिधान केला होता, त्याचे केस कुरळे होते आणि त्याची उंची अंदाजे ५ फूट इतकी होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांचा वावर असलेल्या ठिकाणी हल्ला
जिल्हा न्यायालयाच्या आवारात दिवसभर पोलिसांची वर्दळ असते. तेथून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गुन्-हेगारांनी प्राणघातक हल्ला करण्याचे धाडस केल्याने चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नाकाबंदी सुरू असताना बाबा चौकातून हल्लेखोर चाकूसह पळून गेले ? रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. शहराच्या मुख्य रस्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे.