

156 unauthorized constructions on Sevenhill-Anand Gade Chowk road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांवर मार्किंग आणि मोजणी सुरू केली आहे. यात बुधवारी (दि. २३) सेव्हनहिल ते दर्गा चौकापर्यंत तर गुरुवारी दर्गा चौक ते आनंत गाडे चौकापर्यंत अनुक्रमे १११ आणि १४८ अशा एकूण २५९ मालमत्तांवर मार्किंग करण्यात आली. त्यापैकी तब्बल १५६ मालमत्ता अनधिकृत असल्याचे आढळले. त्यात पत्र्याचे शेड, संरक्षण भिंत, दुकानांचा समावेश असून, त्यासर्वांना नोटीस बजावून स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेने रस्ते रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहर विकास आराखड्यात मंजूर असलेल्या रस्त्यांवर रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी रस्त्याची मोजणी करून मार्किंग केली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून सेव्हनहिल ते सूतगिरणी या ३० मीटर रस्त्यावर अनाउन्समेंट करून महापालिकेच्या पथकाने मालमत्ताधारकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर बुधवारी मनपाच्या नगररचना विभागातील दोन पथकांनी सेव्हनहिल ते सूतगिरणी या ३० मीटर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोजणी करून मार्किंग केली. त्यानंतर पुढे सूतगिरणी ते दर्गा चौकापर्यंतच्या २४ मीटर रस्त्यावर मार्किंग केली.
गुरुवारी सकाळपासून दर्गा चौकाहून पुढे भाजीवाली बाई आणि त्यापुढे आनंद गाडे चौकपर्यंत दोन्ही बाजूंनी मार्किंग करण्यात आली. यात सेव्हनहिल ते आनंद गाडे चौक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सुमारे १५६ मालमत्ता अनधिकृत असल्याचे अढळले असून, त्यावर लवकरच बुलडोझर चालविण्यत येणार आहे. या मोजणी पथकात नगररचना विभागाचे अभियंता सौरभ साळवे, सुरज सरवणकर, आश्विन दांडगे, राहुल पगडे, अतिष विधाते, गणेश चाफे, सलमान शेख, प्रज्योत चव्हाण, अजय लोखंडे, अभिजित खरात, निरज कापडे, औताडे, सोनवणे, शुभम त्रिभुवन यांचा समावेश होता.
▶▶ एकूण मालमत्ता सर्वेक्षण - १४८
शासकीय इमारत-१
एकूण व्यावसायिक ४४,
▶▶बाधित मालमत्ता २८, बाधित नाही-१६
एकूण मिश्र (निवासी व्यावसायिक) ६५,
बाधित ४६, बाधित नाही-१९
एकूण निवासी मालमत्ता- ३८.
बाधित-१९, बाधित नाही-१९
▶▶ एकूण मालमत्ता सर्वेक्षण- १११
▶▶ एकूण बाधित मालमत्ता- ६३
▶▶ व्यावसायिक मालमत्ता- ४२
▶▶▶ शासकीय कार्यालय- २
इतर मालमत्ता- ३