

196 teams were formed to check malpractices in examinations, only 56 teams carried out the work
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एकूण १९६ पथके स्थापन केली होती. मात्र यातील केवळ ५६ पथकांतील सदस्यांनीच हजर राहून कामगिरी बजावली. उर्वरित १४० पथकांनी या कामात दांडी मारल्याचे समोर आले आहे. परीक्षा विभागाकडून आता पथक नियुक्ती समितीकडे याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
विद्यापीठाच्यावतीने पदवी, पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा नुकत्याच घेतल्या. चार जिल्ह्यांतील २३७ परीक्षा केंद्रांवर पदवी परीक्षा पार पडल्या. तर पदव्युत्तर पदवी परीक्षेसाठी ७० आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा ४० पेक्षा अधिक केंद्र देण्यात आली होती. या सर्व परीक्षांसाठी वेगवेगळी भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.
परीक्षेत कुठल्या पद्धतीने कॉप्या होऊ नयेत्त अथवा इतर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा विभाग प्रयत्नशील होता. खुद्द कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनीही परीक्षेदरम्यान असंख्य परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन कॉप्या पकडल्या. काही परीक्षा केंद्रांवर तर सामूहिक कॉपी होत असल्याचे समोर आले. अशा केंद्रांवर लगेचच बैठी पथके तैनात करण्यात आली.
आता सर्व परीक्षा संपल्यानंतर परीक्षा विभागाने भरारी पथकांच्या कामगिरींचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारची एकूण १९६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी केवळ ५६ पथकातील सदस्यांनीच हजर होत हे काम केले.
उर्वरित १४० पथकांचे सदस्य या कामावर हजरच झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या पथकांबाबतचा अहवाल पथक नियुक्ती समितीसमोर सादर केला जाणार आहे.
कुलगुरूंचे पथकच ठरले भारी परीक्षा विभागाच्या भरारी पथकांव्यतिरिक्त स्वतः कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनीही अनेक महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. या दरम्यान एकट्या कुलगुरूंनी कॉपीची सुमारे ३२५ प्रकरणे पकडली.
तसेच कुलगुरूंनी नेमलेल्या पथकांपैकी डॉ. पुरुषोत्तम देशमुख आणि डॉ. अभिजित शेळके यांनी कॉपीच्या शंभराहून अधिक कारवाया केल्या. तर दुसरीकडे परीक्षा विभागाच्यावतीने नियुक्त इतर पथकांकडून मात्र कॉपी प्रकरणी कुठल्याही कारवाया झाल्या नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.