Khultabad Municipal Election : खुलताबादमध्ये दोन सत्ताधारी आमदारांमध्ये खरी लढत रंगणार
A real fight will be fought between two ruling MLAs in Khultabad.
सुनील मरकड :
खुलताबाद : खुलताबाद नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन सत्ताधारी आमदारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खरी लढत रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या ताब्यात राहिले असून, यंदा हे पद कायम राखण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.
तालुक्याचे भाजपा आमदार प्रशांत बंब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण या दोन्ही सत्ताधारी आमदारांची नगराध्यक्ष व जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू आहे. दोन्ही पक्ष सर्व बाजूने सक्षम असेल असा उमेदवार शोधताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास सर्व प्रभागांमध्ये उमेदवार जाहीर केले आहे. तर भाजपाकडून सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाने प्रचाराला लावले असून वेळेवर योग्य उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांची तालुक्यात मजबूत पकड आहे. तर काँग्रेस पक्षाचा शहरात नेतृत्व करणारा खंबीर नेता नसला तरीही शहरातील नागरिकांनी नेहमी काँग्रेस पक्षाकडे कल दिलेला आहे.
अनेक वर्षांपासून नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता जास्त असून पालिकेत जास्ती जास्त काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आल्याचे आतापर्यंतच्या इतिहासावरून दिसून येत आहे. राज्यात व जिल्हयात भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता युती असली तरी पण शहरात खरी लढात यांच्यात होणार. यामुळे सत्ताधारी आमदारांच्या समर्थकांमध्ये देखील तणावपूर्ण वातावरण असून, कोणत्या पक्षाचे जास्त नगरसेवक तर नगराध्यक्ष पद कोणाच्या झोळीत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लढत चुरशीची होण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेत काँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी या वेळी दोन्ही सत्ताधारी आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणे, गटबाजी आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा कल यावरच यंदाची नगराध्यक्षपदाची लढत अवलंबून राहणार आहे. त्यामुळे खुलताबाद नगरपालिकेची निवडणूक हायव्होल्टेज ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

