

A magnificent Ramatheerth is being built in the lap of Gautala in Kannada taluka
संजय मुचक
कन्नड : तालुक्यातील गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य कुशीत हिवरखेडा (गौताळा) येथे भव्य राम मंदिर आकारास येत असून, मराठवाड्यातील एक महत्त्वाचे रामतीर्थ म्हणून हे ठिकाण विकसित होत आहे. मध्यप्रदेशातील धार येथील 'नित्यानंद धाम'चे प्रमुख बापजी ॐ श्री समर्थ नित्यानंदजी भगवान यांचे शिष्य स्वामी विश्वानंदजी अवधूत यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. दिवंगत दगडू पाटील लवांडे यांनी दान केलेल्या दोन एकर जागेवर मंदिर परिसर साकारण्यात आला आहे.
शिवभक्तीपासून रामभक्ती उज्जैनच्या महाकालाचे भक्त असलेल्या स्वामी विश्वानंदजी अवधूत यांच्या मनात सुरुवातीला या ठिकाणी शिवमंदिर उभारण्याचा विचार होता. मात्र, गौताळा परिसरातील या भूमीशी प्रभू श्रीरामांच्या वनवासकाळाच्या संदर्भातील परंपरा आणि पुरातन अवशेष जोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सीतामाईंच्या नान्हीचा उल्लेखही स्थानिकांकडून केला जातो. या पवित्र भूमीला प्रभू श्रीरामांचा चरणस्पर्श लाभल्याची भावना निर्माण झाल्यानंतर स्वामीजींनी येथे भव्य राम मंदिर उभारण्याचा संकल्प केला. या परिसरात सीताखोरी, सीता न्हाणी, गौतम ऋषी मंदिर, केदारकुंड आणि धवलतीर्थ यांसारखी धार्मिक व नैसर्गिक स्थळे असल्याची नोंद आहे.
मंदिराचे भूमिपूजन सन २००० मध्ये करण्यात आले. त्यानंतर २०१७ मध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच कोरोना महामारीच्या काळात काम काही काळ रखडले.
स्वामीजींच्या 'निरंकार चातुर्मास उपासा'च्या संकल्पासह रामभक्तांनी दिलेल्या देणग्या व सहकार्यामुळे मंदिराचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. भव्य वास्तुरचना, मंदिर परिसराची सजावट आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात या डोंगर-दऱ्यांच्या परिसरातून गेले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. या कथेशी संबंधित म्हणून काही ठिकाणांची नावे रामायणातील प्रसंगांशी जोडली जातात. विशेषतः सीताखोरी आणि सीता न्हाणी या नावांमुळे धार्मिक श्रद्धेला अधिक बळ मिळते.