

A case has been registered against the MIM candidate as well as party workers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे जिन्सी आणि सिटी चौक भागात तणाव निर्माण झाला आहे. माजी खा. इम्तियाज जलील यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर, काँग्रेसच्या कलीम कुरेशीसह ५० जणांवर जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर आता काँग्रेसच्या उमेदवारानेही एमआयएमचे उमेदवार फेरोज खान यांच्यासह कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा संघर्ष टोकाला गेला आहे.
फेरोज खान मोईनोद्दीन खान (रा. शहागंज), अफरोज खान मोईनोद्दीन खान, अकबर खान मोईनोद्दीन खान, माजेद खान, असरार खान, रहीम खान, रफीना बेगम, मुजाहेद खान शकील खान, अदनान अश्रफ हुसैन, मास खान, आमेर आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील फेरोज खान हा एमआयएमचा उमेदवार आहे.
काँग्रेसच्या उमेदवार मलेका कुरेशी हबीब कुरेशी या आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असताना एमआयएमचे उमेदवार फेरोज खान यांनी त्यांना अडवले. माझ्या प्रभागात येऊन प्रचार कशाला करता?
असे म्हणत खान यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मलेका कुरेशी यांनी केला आहे. तसेच सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात फेरोज खान, अफरोज खान, अकबर खान यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयएमच्या ११ कार्यकर्त्यांना अटक
भागात दुसरीकडे, जिन्सी एमआयएमच्या रॅलीवर आणि इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. आंदोलकांनी रॅली रोखून जलील व पोलिसांच्या दिशेने अंडी भिरकावली. या प्रकरणी हवालदार शेख शफिक मसलोद्दीन यांच्या फिर्यादीवरून कलीम कुरेशी, हबीब कुरेशी यांच्यासह ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिन्सी पोलिसांनी ११ जणांना अटक केली. यामध्ये आवेज शकील कुरेशी, गफार कुरेशी, सईद शमीम सय्यद, हुजेफ हनीफ कुरेशी, सलीम वसीम शेख आणि सलीम अब्बास कुरेशी यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सहा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.