

A 17-year-old boy was kidnapped in a film-style manner, but was rescued within two hours.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्पोर्ट बाईकच्या व्यवहारातून एका १७ वर्षीय मुलाचे सात जणांच्या टोळीने कारमधून फिल्मीस्टाईल अपहरण केले. ही थरारक घटना शुक्रवारी (दि.२) रात्री सव्वा बाराच्या सुमारास बजरंग चौकात घडली. घटनेची माहिती मिळताच सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दोन पथकांसह पाठलाग करून वाळूज भागातून अवघ्या दोन तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विवेक गणेश सोनवणे (१९, रा. रांजणगाव शेणपुंजी), पांडुरंग माधवराव सोनवणे (२१, रा. जाधववाडी, सुरेवाडी) आणि रोहन सुनील ढवळे (१९, रा. बजाजनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी शनिवारी (दि. ३) दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी ३७वर्षीय महिलेचा (रा. सिडको एन ७) साडेसतरा वर्षीय मुलगा (सचिन नाव बदलेले) हा बारावीत शिकतो. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सचिनचा मित्र त्याला घेण्यासाठी आल्याने तो घराबाहेर पडला. रात्री सव्वा बाराच्या सुमारास दोघे स्कुटीवरून एन-६ भागातून बजरंग चौकाकडे जात असताना अचानक मागून आलेल्या दोघांनी सचिनचा शर्ट पकडून त्याला ओढण्यास सुरुवात केली.
स्कुटी वेगात नेत असताना तोल जाऊन दोघे खाली पडले. तेवढ्यात आणखी एक तरुण धावून आला. तिघांनी मिळून सचिनला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आणखी तिघांनी सचिनला जबरदस्तीने कारमध्ये (एमएच-२०-एचएच-४६६८) मध्ये कोंबले. कारमधील पाच आणि दुचाकीवरील दोघे असे एकूण सात जण सचिनला घेऊन पसार झाले. ही घटना सचिनच्या सोबतच्या मित्राने त्याच्या मामाला कळवली. त्यांनी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांना तत्कळ माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून येरमे यांनी तपासाची चक्रे फिरविली.
वाद नेमका काय?
आरोपी ढवळे याची स्पोर्ट बाईक सचिनला विक्री केली होती. मात्र, सचिनने गेल्या पाच महिन्यांपासून पैसेही दिले नाही आणि बाईकही गायब केली. मध्यंतरी सचिन मुंबईला निघून गेला होता. तो परत घरी आल्याची माहिती आरोपीना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कट रचून त्याचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे.
लोकेशन देणारा रडारवर
सचिन घरातून मित्रासोबत रात्री घराबाहेर पडला होता. तेव्हा त्याला रस्त्यात दुसऱ्या एका मित्राने कॉल करून कुठे आहेस ? भेटायला ये असे सांगितले होते. त्यामुळे लोकेशन देणारा तोही संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मध्यरात्रीचा थरारक पाठलाग
उपनिरीक्षक अनिल नाणेकर, निवृत्ती गायके यांच्या पथकाला शोधासाठी रवाना केले. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, वाहन क्रमांक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकांनी वाळूजच्या दिशेने अप-हरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींची त्याला कारमध्ये मारहाण करतच नेले.
वाळूज भागात कारमध्ये सचिन घेऊन आरोपी फिरत असताना अवघ्या दोन तासांत अपहरण केलेल्या सचिनची सिडको पोलिसांनी सुखरूप सुटका केली. टोळीतील तिघे सापडले उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल नाणेकर, निवृत्ती गायके, हवालदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, विशाल सोनवणे, अमोल अंभोरे, प्रदीप फरकाडे, देवा साबळे आदींनी केली.