छ. संभाजीनगर : शाळा सुरू असतानाच शिक्षकाला लागली डुलकी; व्हिडिओ व्हायरल

छ. संभाजीनगर : शाळा सुरू असतानाच शिक्षकाला लागली डुलकी; व्हिडिओ व्हायरल

आडुळ; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील दरेगाव येथील शाळेत शाळा सुरु असताना शिक्षकाने खूर्चीवरच डुलकी घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरेगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी (दि.१९) भरदुपारी शिक्षकाला झोप लागल्याचे निदर्शनास येताच पालकांनी त्यांचा व्हिडिओ करत त्यांना जाब विचारला.

दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुले शाळेच्या प्रांगणात खेळत होती. यावेळी शिक्षक प्रल्हाद गाढे हे खुर्चीवरच बसून गाढ झोपी गेल्याचे काही मुलांच्या निदर्शनास आले. त्यांनी पालकांना याची माहिती दिली. पालकांनी शाळेत धाव घेत गाढे यांचा व्हिडिओ करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. आपला व्हिडिओ व्हायरल केल्याचे पाहून शिक्षकाची झोपच उडाली. त्यानंतर शाळात झोपलेल्या शिक्षकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा शाळेंला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

काही मुले शाळेतून घरी आली व त्यांनी आमचे सर शाळेत झोपले आहेत असे सांगितले. त्यानंतर आम्ही शाळेत जाऊन त्या शिक्षकांचा व्हिडिओ केला. याबाबत त्या शिक्षकाची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
प्रदीप भावले, पालक

logo
Pudhari News
pudhari.news