LokSabha Election 2024: लोकसभेच्या तोंडावर एमआयएमला दणका; माजी नगरसेवकाचा राजीनामा | पुढारी

LokSabha Election 2024: लोकसभेच्या तोंडावर एमआयएमला दणका; माजी नगरसेवकाचा राजीनामा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच एमआयएममध्ये अंतर्गत वाद पेटला आहे. पक्षातील नव्या कार्यकर्त्यांमुळे जुन्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करीत महापालिकेतील एमआयएमचे माजी गटनेते तथा माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना रविवारी (दि. १४) राजीनामा सादर केला आहे. तसेच आणखी काही नाराज माजी नगरसेवकही राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (LokSabha Election 2024)

जिल्ह्यात मागील दहा वर्षांपासून एमआयएमने महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकींमध्ये मुस्लिम व दलित मतांच्या जोरावर आपली छाप निर्माण केली आहे. या मतांमुळेच एमआयएमला मनपातील दुसरा मोठा पक्ष होण्याचा सन्मान मिळाला. एवढेच नव्हे तर काँग्रेसकडे अनेक वर्षांपासून असलेले मनपातील विरोधी पक्ष नेतेपद देखील एमआयएमला स्वत:कडे खेचण्यात यश आले होते. तसेच मत विभाजन आणि मुस्लिम, दलित मतांमुळे एमआयएमला २०१४ साली आमदार तर २०१९ सालीच्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी मिळविता आली होती. परंतु, आता एमआयएममध्ये अंतर्गत धूसफूस मोठ्याप्रमाणात वाढली आहे. (LokSabha Election 2024)

एमआयएममध्ये नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना पदांसह सन्मानाची वागणूक दिली जात आहे. तर जुन्यांना गृहीत धरून बाजूला सारले जात आहे. त्यांच्याकडे स्पेशल दुर्लक्ष केले जात आहे. याच कारणामुळे जुने-नवे असा वाद पेटला असून त्यामुळे नाराज झालेले एमआयएमचे मनपातील माजी गटनेते तथा माजी नगरसेवक ढगे यांनी प्रदेशाध्यक्ष खा. जलील यांच्याकडे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा सादर केला आहे. अगोदरच वंचित बहुजन आघाडी दूर गेल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमची चिंता वाढली आहे. त्यात ढगे यांच्या बाजूने असलेली काही दलित मतेही दूर गेल्यास पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. (LokSabha Election 2024)

१० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ

एमआयएममध्ये मागील १० वर्षांपासून कार्यरत होतो. पक्षाचे वरिष्ठ नेते जे आदेश देतील, त्यानुसारच काम करीत राहिलो. पक्षाने ज्या पदांची जबाबदारी दिली. ती एकनिष्ठ राहून पार पाडली. परंतु, नवे कार्यकर्ते जून्यांचा सन्मान करीत नसल्याने व त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करूनही काहीच होत नसल्याने राजीनामा दिला आहे.
गंगाधर ढगे (माजी गटनेते, मनपा)  

Back to top button