छत्रपती संभाजीनगर : बुलेटस्वार टवाळखोरांचा विद्यापीठातून विद्यार्थिनीला उचलून नेण्याचा प्रयत्न; तिघींची छेडछाड | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : बुलेटस्वार टवाळखोरांचा विद्यापीठातून विद्यार्थिनीला उचलून नेण्याचा प्रयत्न; तिघींची छेडछाड

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बुलेटस्वार टवाळखोर तिघा तरूणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ तीन अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड काढली. निर्ढावलेले टवाळखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी एका तरुणीला नाव विचारत थेट हाताला ओढत बुलेटवरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनींनी आरडाओरड केल्यावर परिसरातील विद्यार्थी मदतीला धावले. त्यानंतर टवाळखोरांनी बुलेटवरून पोबारा केला. विद्यापीठातील वाय पॉइंटजवळ गुरूवारी (दि. ८) रात्री पावणेआठ वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. या टवाळखोरांनी रस्त्याने येताना आणि जाताना अनेकांना छेडल्याचेही विद्यार्थ्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

विद्यापीठातील एका विद्याशाखेत पदविका अभ्यासक्रमाला असणाऱ्या ६ विद्यार्थींनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वसतिगृहातून बाहेर पडल्या. रस्त्याने फिरत-फिरत त्या विद्यापीठातील मुख्य रस्ता वाय पॉइंटपर्यंत चालत आल्या. त्याठिकाणी आल्यानंतर एका विद्यार्थींनीची तब्येत बिघडल्याने तिला तिघांनी रिक्षातून प्रवेशद्वारावरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. अन्य दोन विद्यार्थिनी घटनेची माहिती सांगण्यासाठी वसतिगृहात परतल्या. त्यानंतर वसतिगृहाच्या वार्डन रुग्णालयात पोहचल्या. तब्येत बिघडलेल्या विद्यार्थिनीचे पालक शहरातील असल्यामुळे ते तत्काळ रुग्णालयात आले. उपचारानंतर त्या मुलीला पालकांनी घरी नेले.

अन् बुलेटस्वार टवाळखोरांनी तरुणींना गाठले

उपचार घेतलेल्या विद्यार्थिनीला तिचे पालक घरी घेऊन गेल्यावर तिच्यासोबत असलेल्या तिन्ही विद्यार्थिनी चालत वसतिगृहाकडे निघाल्या. रात्री पावणेआठच्या सुमारास वसतिगृहाकडे चालत जात असताना बुलेटवरून ट्रीपलसीट आलेल्या टवाळखोरांनी त्यांना गाठले. त्यांची छेड काढायला सुरुवात केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने घाबरलेल्या मुलींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. काहीही प्रतिकार न करता पुढे चालत राहिल्या. त्यामुळे टवाळखोरांची हिंमत वाढली. त्यांनी एका विद्यार्थिनीला थेट तिचे नाव विचारले. त्यामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या होत्या.

हात धरला अन् बुलेटकडे ओढले

टवाळखोरांमुळे या तिन्ही अल्पवयीन मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी वसतिगृहाकडे जाणारा रस्ताही बदलला. तरीही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग करणे सोडले नाही. त्यानंतर बुलेट थांबवून दोन टवाळखोर त्या विद्यार्थिनींकडे चालत गेले. त्यांनी एका विद्यार्थिनीचा हात धरला. तिला पकडून बुलेटकडे ओढण्याचा प्रयत्न केला. तिला बुलेटवर बसून आमच्यासोबत चल, अशी धमकी टवाळखोर देत होते. आधीपासून भीतीपोटी शांत असलेल्या विद्यार्थिनींनी यानंतर मदतीसाठी आरडाओरड करताच परिसरातील विद्यार्थी मदतीला धावून गेले. त्यानंतर तिघे टवाळखोर बुलेटवरून पळून गेले.

तिन्ही विद्यार्थिनी भेदरल्या

बुलेटस्वार टवाळखोर पळून गेल्यावर लगेचच मुलांनी डायल ११२ वरून पोलिसांना माहिती दिली. काही क्षणात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तिन्ही विद्यार्थिनी प्रचंड भेदरलेल्या होत्या. त्यांना उपचाराची गरज असल्याचे पाहून पोलिसांनीच त्यांना घाटीत दाखल केले. गुरुवारी रात्री १ वाजेपर्यंत दोन मुलींवर उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तीनपैकी दोन मुलींची प्रकृती शुक्रवारीदेखील बिघडल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिन्ही विद्यार्थीनी घाबरून गेल्या. यातील दोघींना तर हा धक्का सहन झाला नाही. त्यांची प्रकृती बिघडली असून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. ९ फेब्रुवारीला त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकारामुळे विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. नूतन पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळले. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांनी जबाब नोंदवून बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक हारुण शेख करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button