छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर भीषण अपघात, कार-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर भीषण अपघात, कार-दुचाकीची समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ७ फूट उंच उडालेला दुचाकीस्वार तरुण कारवर आदळून जागीच ठार झाला. यामध्ये दुचाकीच्या समोरचा भाग वाकला अन् टायरही फुटले. तसेच, कारच्या समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. कारची अवस्था पाहिल्यास दुचाकीची धडक बसली असेल यावर कोणालाही विश्वास बसत नाही. यावरून दोन्ही वाहनांची गती किती जास्त असेल याचा अंदाज येतो. बीड बायपासवरील गोदावरी टी उड्डाणपुलावर बेंबडे हॉस्पिटलसमोर ३ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता हा भीषण अपघात घडला.

भाऊसाहेब गोरख निकम (३१, रा. देवपूर, ता. कन्नड), असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकम यांचा भाऊ बीड बायपासवरील नाईकनगरात राहतो. ३ फेब्रुवारीला भावाला भेटण्यासाठी ते दुचाकीने निघाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास ते महानूभव आश्रम चौकाकडून नाईकनगरकडे जात असताना गोदावरी टी उड्डणपुलावर आले. त्यांची दुचाकी बेंबडे हॉस्पिटलच्या समोर येताच झाल्टा फाटा येथून निघालेल्या संकेत गणेश कानतोटे (रा. ताडपिंपळगाव, देवगाव रंगारी, ता. कन्नड) याची कार (क्र एमएच २०, एफयू ८९२५) समोर आली. वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात निकम यांच्या दुचाकीची कारला समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीच्या धडकेने कारचा समोरील भाग फुटला. निकम हे सात ते आठ फूट उंच उडाले आणि कारच्या समोरील काचेवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. जागीच त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले होते. त्यांना स्थानिकांसह पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप, सुरज जारवाल यांनी घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दोन मुलींचे पितृछत्र हरपले

भाऊसाहेब निकम हे गावी शेती करतात. ते विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे दोन्ही मुलींचे पितृछत्र हरपले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत, असे सातारा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सातारा ठाण्यात नोंद केली असून अधिक तपास हवालदार पृथ्वीराज चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news