छत्रपती संभाजीनगर : विश्रांतीनगरात कचरा वेचणाऱ्या मुलीने घराबाहेर खेळणाऱ्या २ वर्षांच्या बाळाला पळवले | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : विश्रांतीनगरात कचरा वेचणाऱ्या मुलीने घराबाहेर खेळणाऱ्या २ वर्षांच्या बाळाला पळवले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विश्रांतीनगरात कचरा वेचणाऱ्या एका मुलीने दारात खेळणारे २ वर्षांचे बाळ उचलून नेल्याची घटना रविवारी (दि. १४) घडली. विश्रांतीनगरात दुपारी साडेचार वाजता घडलेल्या या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. हा प्रकार शेजारच्या महिलेच्या लक्षात आल्यावर काही अंतर चालत गेलेल्या मुलीकडून बाळाला परत आणले. आज (दि १५) या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात मुलीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाला उचलून घेऊन जाणाऱ्या मुलीसह भंगार दुकानदार तयब शेख, त्याचा मुलगा नवीद यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश यादव यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, २२ वर्षीय सोनल (नाव काल्पनिक आहे) फिर्यादी आहे. ती पती आणि २ वर्षांच्या बाळासह विश्रांतीनगर भागात राहते. तिचा पती सेंट्रींगची कामे करतो. तो कामानिमित्त बाहेर गेलेला असताना त्यांचे बाळ दारात खेळत होते. सोनल घरात काम करीत होती. त्याचवेळी नकली (नाव काल्पनिक आहे) नावाची एक मुलगी कचरा वेचत या परिसरात आली. तिने सर्वांची नजर चुकवून सोनलच्या २ वर्षाच्या मुलाला कडेवर उचलले आणि रस्त्याने जोरात चालू लागली. हा प्रकार सोनच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला सांगितला. ती धावत रस्त्यावर आली. काही अंतरावर चालत गेलेल्या नकलीला गाठले आणि तिच्याकडून बाळाला परत घेतले. मात्र, या प्रकारामुळे सोनलला धक्का बसला. तिने नकलीला पकडून विचारपूस केली. तेव्हा तिने भंगार दुकानदाराच्या मुलाने या बाळाला घेऊन जाण्यास सांगितल्याची कबुली दिली. सोनलने हा प्रकार पतीला कळविला. तो लगेचच घरी आला. त्यांनी भंगार दुकानदार तयब शेखला विचारणा केली असता त्यांनी सोनलच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर सोनल व तिच्या पतीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तयब शेख, त्याचा मुलगा नवीदसह बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक आनंद बनसोड करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश यादव यांनी दिली.

नेमका प्रकार काय? याची विचारपूस केली जात आहे. परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज आहे का? याचाही शोध सुरु आहे. बाळ सुखरूप परत मिळालेले आहे. वस्तुस्थिती तपासून कारवाई केली जाईल.
– राजेश यादव, पोलिस निरीक्षक, पुंडलिकनगर ठाणे.

Back to top button