छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर आता नकोशा झालेल्या प्रियकराचा प्रेयसीनेच काटा काढला. तिच्यासह चार ते पाच जणांनी लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह साई टेकडी परिसरात फेकून दिला. १४ डिसेंबरला हा मृतदेह आढळल्यावर चिकलठाणा पोलिसांनी ओळख पटविली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी या खुनाला वाचा फुटली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. आनंद साहेबराव वाहुळ (२७, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, आनंदचे चिकलठाणा परिसरातील एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो रिक्षा चालवित होता, ते जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले. मात्र, महिलेची मुले मोठी झाली. आनंदचे व्यसन वाढले. त्यामुळे महिलेने आनंदला दूर केले होते. त्यावरून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. काही दिवसांपासून त्यांचे सूत जुळत नव्हते. सतत वाद व्हायचे. त्यामुळे आनंद मध्येच कामाच्या शोधात मुंबईला गेला. काही दिवस तिकडे रमला मात्र, पाच दिवसांपूर्वी तो पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरात आला. त्यानंतर त्याने पुन्हा प्रेयसीचे घर गाठले. तेव्हा महिलेने त्याला आता माझा नाद सोड, असे बजावले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. १३ डिसेंबरला महिलेने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रारही दिली होती. त्यावरून आनंदविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आनंदच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही, अशी माहिती चिकलठाणा ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी दिली.
आनंद वारंवार महिलेला त्रास देत असल्यामुळे तिने मुलाला हा प्रकार सांगितला. मुलाने त्याच्या तीन मित्रांना सोबत घेऊन आनंद घरी येताच त्याला घरात कोंडले. काठीने बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध पडला. निपचित पडलेल्या आनंदला दोघांनी दुचाकीवरून साई टेकडी परिसरात नेऊन फेकले होते.
१४ डिसेंबरला सायंकाळी काही लोक साई टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यांना हा मृतदेह आढळला. ही माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे, सहायक उपनिरीक्षक एम. के. नागरगोजे, अंमलदार दीपक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तत्काळ घाटीत पाठविला. १४ डिसेंबरला रात्री मृतदेह शवागृहात ठेवला होता. त्याच रात्री चिकलठाणा पोलिसांनी व्हाट्सअॅपवरून त्याचा फोटो व्हायरल केला होता. शहरातील पोलिसांना मिसिंगबाबत माहिती मागविली होती. उस्मानपुऱ्यातील त्याच्या भावाने हा फोटो पाहिल्यानंतर १५ डिसेंबरला घाटीत जाऊन खात्री केल्यावर ओळख पटली.