छत्रपती संभाजीनगर : २४२ फिर्यादींना पोलिसांचे ५ कोटींचे दिवाळी गिफ्ट; चोरीला गेलेला मुद्देमाल केला परत | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : २४२ फिर्यादींना पोलिसांचे ५ कोटींचे दिवाळी गिफ्ट; चोरीला गेलेला मुद्देमाल केला परत

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चोरीला गेलेला मुद्देमाल धनत्रयोदशीला परत करून ग्रामीण पोलिसांनी २४२ फिर्यांदीना ५ कोटी ७१ लाखांचे दिवाळी गिफ्ट दिले. पालकमंत्री संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १०) १४ हायवा, ४३ चारचाकी, ८५ दुचाकी, २५ तोळे सोने, ९ लाख रुपये रोकड, २० मोबाइलसह लॅपटॉप, बॅटऱ्या, जनावरे असा मुद्देमाल परत करण्यात आला. धनत्रयोदशीला आपला दागिना हाती पडताच अनेक महिलांचे मन गहिवरून आले.

या कार्यक्रमाला विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चोरी गेलेला ऐवज परत मिळेल की नाही, याची काहीही शाश्वती नसते, पण ग्रामीण पोलिसांनी नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवित चोरांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दिवाळी सणानिमित्त नागरिकांना विशेष कार्यक्रम घेऊन हा मुद्देमाल परत केला.

यावेळी उषाबाई विठ्ठल नवपुते (चित्तेगाव) यांना सोन्याचा पत्ता व मनी, सुनंदा सुरेश क्षीरसाग (रा. हतनूर, ता. कन्नड) यांना अंगठी, जोडवे, चेन, कडे आणि द्वारकाबाई रत्नाकर वाघचौरे (रा. भिलपटन, ता. कन्नड) यांना सोन्याची पोत, मंगळसूत्र असे दागिने परत केले. दागिने हाती पडताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उजाळला. यावोळी जिल्ह्यात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविणाऱ्या पोलिस ठाणेदार व पोलिस पाटलांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, सहायक निरीक्षक सुधीर मोटे, जनसंपर्क अधिकारी शैलेद्र जाधव यांच्यासह सर्व ठाणेदारांनी परिश्रम घेतले.

पोलिसांसाठी दोन कोटींचे विश्रामगृह

आपल्याकडे न्यायालयीन कामकाजासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून पोलिस अधिकारी, कर्मचारी येतात. त्यांना मुक्कामी राहण्याची वेळ आली तर निवासाचा प्रश्न समोर येतो. त्यामुळे शहरात दीड ते दोन कोटींचे विश्रामगृह बांधण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री भुमरे यांनी दिले. याशिवाय पोलिसांना गस्तीसाठी व तपासात मदत व्हावी म्हणून वाहनेही दिली जातील. निजामकालीन पोलिस ठाण्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जातील, असेही भुमरे यावेळी म्हणाले.

फिर्यादींना परत केलेल्या मुद्देमालाची आकडेवारी

– २ कोटी ५९ लाख ४४ हजार – ४३ चारचाकी
– १ कोटी ८१ लाख ६६ हजार – १४ अवजड वाहने
– ४७ लाख ८३ हजार – ९० मोटारसायकल
– १२ लाख ५० हजार – २५ तोळे सोने
– ९ लाख रुपयांची रोकड
– ३ लाख रुपयांचे – २० मोबाइल
– ५७ लाख ६३ हजार : इतर साहित्य

हेही वाचलंत का?

Back to top button