छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रे | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ९ तालुक्यातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात १६ सार्वत्रिक तर २८ ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या दोन्ही निवडणुकीच्या सरपंच पदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

जानेवारी-डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या आणि सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणुका होऊ शकल्या नाही. अशा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह सरपंच पदाच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका रखडल्या होत्या. त्यासाठी येत्या ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद आणि सोयगाव या तालुक्यातील १६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी २४८ उमेदवार रिंगणात आहेत. तर पोटनिवडणुकीच्या एक सरपंच पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत.

नऊ तालुक्यात मतदान केंद्रे

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी फुलंब्री १, छत्रपती संभाजीनगर ६, सोयगाव ५, गंगापूर १८, कन्नड ३, खुलताबाद १३, सिल्लोड ६, पैठण ७ आणि वैजापूरातील ९ अशा एकूण ६८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक विभागातील ४ कर्मचारी तैनात असणार आहेत.

Back to top button