छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या २३ लाख नोंदीत ६८४ अभिलेखांमध्ये कुणबी जातीची नोंद | पुढारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या २३ लाख नोंदीत ६८४ अभिलेखांमध्ये कुणबी जातीची नोंद

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला आहे. या मुद्द्यावर शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या नोंदी तपासण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले आहे. १९४९ पुर्वीच्या नोंदीनुसार जिल्ह्यात तब्बल २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ६८४ अभिलेखांमध्ये कुणबी जातीची नोंद केल्याचे आढळले आहे.

सध्या मराठा समाजाला आरक्षण ही एकमेव चर्चा सगळीकडे सुरु आहे. आंतरवाली सराटीतील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यापुर्वी केलेल्या उपोषण आणि आता उद्भवलेल्या परिस्थितीनंतर शासनाने कुणबी जातीच्या नोंदींची माहिती घेण्यासाठी सर्व अभिलेखे तपासण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडून तब्बल २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखे तपासण्यात आली आहेत. महसुली अभिलेखात खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क – प्रमाणपत्र, कुळ नोंदवही, नागरीकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नंबर १ हक्क नोंदणी पत्रक, नमुना नंबर २ फेरफार पत्रक, सात-बाराचे उतारे अशा नोंदी तपासण्यात आल्या. जन्म-मृत्यू नोंदी रजिस्ट्री (गाव नमुना १४), शैक्षणिक निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, पोलीस दलातील गाववारी, गोपनीय रजिस्टर, गुन्हे रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर रजिस्टर आदी ११ विभागातील ४४ प्रकारची अभिलेखे तपासण्यात आली आहेत. त्यापैकी महसुली अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी व १९६७ पुर्वीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा अभिलेखात प्रत्येकी १ आणि भूमी अभिलेखामध्ये ९१ अशा एकुण कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत.

तपासण्यात आलेले अभिलेख

महसुली अभिलेखे १५३५३४७, जन्म-मृत्यू नोंदी १२५५९, शैक्षणिक अभिलेखे ३५४२११, कारागृह अधीक्षक १४२७०, पोलीस दल १५०५६, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ८९४३६, भुमी अभिलेख विभाग २८८०१९, जिल्हा वक्फ अधिकारी ५६५ आणि १९६७ पुर्वीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका १९८ अशी अभिलेखांची आकडेवारी आहे.

Back to top button