

634 dengue-like patients found in the city in 10 months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात १० महिन्यात ६३४ डेंग्य सदृष्य रुग्ण आढळले असून पावसाळा लांबल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेत ३ नोव्हेंबरपासून शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असते. यंदा पावसाळा अधिक काळ सुरू राहिल्याने डेंग्यूच्या प्रकरणांत हळूहळू वाढ होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २८ ऑक्टोबरदरम्यान शहरात एकूण ६३४ संशयित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आरोग्य व मलेरिया विभागाने एकत्रितपणे शहरात प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत सर्व झोन कार्यालयांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी धूर फवारणी, औषध फवारणी, तसेच पाण्याचे डबके साचलेल्या ठिकाणी खराब ऑईल टाकण्याची कार्यवाही केली.
पावसामुळे डेंग्यूचा धोका कायम
जून-जुलै महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी ऑगस्टपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे डेंग्यूच्या संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कायम असल्याने पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता डॉ. सुमय्या नाझ यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, नागरिकांनी स्वतः च्या परिसरात स्वच्छता राखावी, पाणी साचू देऊ नये आणि डास वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहानही त्यांनी केले आहे.
मनपाकडून राबविले जाणार स्वच्छतेचे उपक्रम
पावसाळा लांबल्यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया आणि आरोग्य विभागामार्फत ३ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत धूर फवारणी, औषध फवारणी, अॅबेट ट्रीटमेंट आणि परिसर स्वच्छतेचे उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची उत्पत्ती रोखणे हेच डेंग्यूविरोधी लढ्याचे प्रमुख शस्त्र असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.