

Sillod 58 thousand bribe-taking agent arrested
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड शहरातील मार्केट यार्ड इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. २९) यशस्वी सापळा कारवाई करताना खासगी एजंटाला ५८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सांडू नारायण शेलार (४६, रा. समतानगर, शिक्षक कॉलनी, सिल्लोड) असे एसीबीच्या पथकाने पकडलेल्या खासगी एजंटाचे नाव आहे.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंदणी सिल्लोड येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे करून देण्यासाठी एजंट सांडू शेलार याने तक्रारदाराकडे एकूण ७० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये १० हजार रुपये शासकीय चलन व उर्वरित ६० हजार रुपये साहेबांसाठी असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.
पडताळणीदरम्यान एजंटाने तडजोडीनंतर एकूण ६८ हजार रुपयांवर समाधान व्यक्त करत, त्यापैकी ५८ हजार रुपये स्वतःकडे घेण्याचे मान्य केले. शुक्रवारी छाप्यात एजंट नारायण शेलार याने तक्रारदाराकडून ५८ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान एजंटाकडून मोबाईल फोनसह लाच रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात खासगी एजंट सांडू शेलार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पो. हवालदार अशोक नागरगोजे, पो. अंमलदार विलास चव्हाण, सी. एन. बागुल यांनी सहभाग नोंदवला.
एसीबीची ही पहिली कारवाई नाही. यापूर्वी एसीबीच्या पथकाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सहायक निंबधकांना लाच घेताना पकडले होते. एसीबीच्या पथकाने घेतलेल्या घराच्या झडतीत कोट्यावधी रुपयांची माया हाती लागली होती. या कारवाईची जिल्ह्यात चर्चा रंगली होती.
प्लॉटच्या शासकीय चलनाच्या तब्बल सहा पटीने लाचेची मागणी करण्यात आली. तर ५८ हजार घेताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. मात्र खासगी एजंटने लाचेची मागणी कुणाच्या सांगण्यावरून केली ? लाच कुणासाठी घेतली ? एजंटावर कुणाचा वरदहस्त आहे ? असे प्रश्न निर्माण होत आहेत. एसीबीच्या पथकाने या कारवाईची खोलात जाऊन चौकशी केली तर मोठे मासे गळाला लागतील, हे मात्र नक्की.