

51 Ganesh idols were made to convey the message of environmental conservation.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणपती म्हणजे ६४ कलांची देवता. यामुळेच प्रत्येक व्यक्तीमध्ये काही न काही कला ही असतेच. अशीच एक मूर्तीकला व अनोखी भक्ती आकाश शिंदे या अभियंतामध्ये पाहायला मिळते. आकाश शिंदे यांनी कुटुंबातील सदस्यांच्या सहकायनि ५१ गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी शिंदे कुटुंबातील सदस्य घरच्या घरीच इको फ्रेंडली बाप्पाचे विविध रूपे साकरत आहेत, यातून पर्यावरणावर जनजागृती केली जात आहे.
यंदाही शहरातील एएस क्लब बजाजनगर येथील शिंदे कुटुंबीयांनी इको फ्रेंडली गणपतीमूर्ती साकारल्या आहेत. गेली तेरा वर्षांपासून आपल्या घरात एक नाही दोन नाही तब्बल ५१ गणपतीची स्थापना करतात. हे सर्व गणपती पर्यावरणपूरक शाडू मातीपासून बनवलेले असतात. आतापर्यंत वेगवेगळ्या ६६३ शाडू मातीच्या गणपतीमूर्तीची निर्मिती आणि स्थापना केली आहे.
प्रत्येक वर्षी नवनवीन गणपतीची रूपे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकाचा रंग रूप हे वेगळे असते ही विशेषता. सगळे गणपती तयार करण्यासाठी साधारण आठ दिवस लागतात. यात सर्व कुटुंब सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात. अभियंता असलेले आकाश शिंदे यांना त्यांची पत्नी डॉ. अर्चना शिंदे, वडील कैलास शिंदे, आई सुनीता शिंदे यांचाही सहभाग यात लाभतो.
इको फ्रेंडली गणेशोत्सवातून त्यांनी पर्यावरण संरक्षण करावे. तसेच गणेशोत्सव काळात शाडूच्या मूर्तीच बसविण्यात यावी, अशी जनजागृती या उपक्रमातून करण्यात येत आहेत. यामुळे यांच्याकडे येतात ५१ गणपती बाप्पा खरे तर याची सुरुवात एक रंजक बालहट्ट असलेली गोष्ट आहे, घरात पहिला गणपतीही मातीचाच बसवला गेला होता.
सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात होता. आकाशने इतरांसारखे आपल्याही घरात गणेशोत्सव साजरा व्हावा, असा हट्ट वडिलांकडे धरला. वडिलांनी मातीपासून गणपती बनवून गणेशोत्सव साजरा केला. तेव्हापासून शिंदे कुटुंबात इको फ्रेंडली गणेशोत्सवास सुरुवात झाली. २०१३ पासून या उत्सवाला सुरुवात झाली आणि ५१ गणपती बसवण्याची परंपरा चालू झाली.
इको फ्रेंडली यातून पर्यावरण संतुलनासाठी मदत तर होतेच, परंतु यातून मिळणारा आनंद आणि गणपतीची होणारी आराधना वर्षभरासाठी प्रचंड ऊर्जा देऊन जाते, असे आकाश शिंदे यांनी सांगितले. इको फ्रेंडली गणेशोत्सव सर्वत्र साजरा व्हावा. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी इको फ्रेंडली गणेशमूर्तीचा वापर व्हावा, जेणेकरून पर्यावरण होणारा ऱ्हास थांबेल, असे आवाहन आकाश शिंदे यांनी केले आहे.