

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एचडीएफसी बँकेतील बँच सेल्स ऑफिसरनेच वेगवेगळ्या ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ४६ लाख २० हजार ८३७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ५ ऑक्टोबरला सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष जयवंत नगराळे, असे आरोपी सेल्स ऑफिसरचे नाव आहे.
संतोष रामराव चंदनसे (३३, रा. गांधेली) हे फिर्यादी आहेत. ते शेती करतात. त्यांचे वडील रामराव माणिकराव चंदनसे यांच्या नावाने बीड बायपासवरील हिवाळे लॉन्सजवळील एचडीएफसी बँकेत खाते आहे. या खात्यातील व्यवहाराचे संदेश येण्यासाठी संतोष यांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे.
आरोपी सुभाष नगराळे याने बँकेतील खातेदार अजम आमीर शेख (२५, रा. गांधेली) यांच्या नावावर परस्पर क्रेडिट कार्ड काढून १५ हजार २९० रुपये कर्ज काढले. शेख मसूद शेख आमेर (४०, रा. गांधेली) यांच्या नावाने क्रेडिट कार्ड काढून ३ लाख २० हजार रुपये कर्ज घेतले. शेख रियाज आमेर (४५, रा. गांधेली) यांच्या नावाने क्रेडिट कार्ड घेऊन १ लाख २५ हजार रुपये कर्ज घेतले. शेख हशोमोद्दीन अमीर (३३, रा. गांधेली) यांच्या नावाने क्रेडिट कार्ड घेतले असून त्यांच्या खात्यातील ११ लाख १० हजार ५४७ रुपये कमी झाले आहेत. गजानन रावसाहेब जगताप (३३, रा. विश्रांतीनगर) यांचे क्रेडिट कार्ड त्यांच्या मित्राला दिले होते. ते कार्ड सुभाष नगराळेकडे गेले. त्याने त्यातून दोन वेळेस मिळून सव्वादोन लाख रुपये काढल्याचे समोर आले आहे.