Sambhajinagar News : भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा ४४ लाखांचा साठा जप्त
44 lakh stock of adulterated food seized
राहुल जांगडे : छत्रपती संभाजीनगर
कालावधीत सणासुदीच्या खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने ११ ऑगस्टपासून शहरासह जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत विविध भागांतील उत्पादक, विक्रेत्यांकडे छापेमारी करत तब्बल ४४ लाख ४८ हजार रुपयांचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे व्यापारी-विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्नपदार्थांसह खाद्यतेलाची मागणी वाढते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनाची बाजारात विक्री होण्याची अधिक शक्यता असते. हे प्रकार रोखण्यासाठी, तसेच ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न प्रशासनाने यंदा गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दसरा या काळात ११ ऑगस्टपासून विशेष तपासणी अभियान सुरू केले.
जिल्ह्यात विविध आस्थापनांच्या एकूण १४१ तपासण्या करण्यात आल्या. यात भेसळयुक्त दूध, खवा-मावा, तूप, तेल, मिठाई, चॉकलेट, भगर, ड्रायफ्फुटसह विविध खाद्यपदार्थांचा एकूण ३० हजार, ५०० किलोपेक्षा अधिक आणि तब्बल ४४ लाख ४८ हजार २३० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
ही मोहिम अन्न प्रशासनाचे सह आयुक्त द.वि.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त विवेक पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने केली. दरम्यान, दिवाळी सणाच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत.

